नवी दिल्ली : ‘‘जी २०’ या सामर्थ्यशाली राष्ट्रगटाचे अध्यक्ष भूषणवण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. ही जबाबदारी पेलताना विश्वकल्याणासाठी काम करण्याची संधी भारताला उपलब्ध झाली आहे. विश्वशांती, एकात्मता, पर्यावरण आणि शाश्वत विकासाला भेडसावणाऱ्या आव्हानांना समर्थपणे तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याच्या उपाययोजना भारताकडे आहेत,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील ९५ व्या मासिक संवादसत्रात व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताकडे १ डिसेंबर रोजी ‘जी-२०’ राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाची सूत्रे अधिकृतरित्या येणार आहेत. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले, की ‘जी-२०’ चे अध्यक्षपद ही भारतासाठी मोठी सुसंधी आहे. यासाठी भारताने ‘एक वसुंधरा, एक कुटुंब व एक भविष्य’ हे सूत्र दिले आहे. त्यात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारताची कटिबद्धता प्रतििबबित होते. ‘जी-२०’ राष्ट्रगटातील सदस्य राष्ट्रांची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या दोन तृतीयांश आहे. जागतिक व्यापाराचा तीन चतुर्थाश वाटा या गटातील सदस्य राष्ट्रांचा आहे. जागतिक स्तरावरील सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ८५ टक्के वाटा या गटाच्या सदस्य राष्ट्रांचा आहे. या राष्ट्रगटात भारतासह अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया, जपान, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अर्जेटिना, ब्राझील, इंडोनेशिया, इटली, दक्षिण कोरिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्थान आणि युरोपियन संघातील देशांचा समावेश आहे.

यावरून आपण कल्पना करू शकता की एका मोठय़ा सामर्थ्यशाली आणि प्रभावी राष्ट्रांच्या गटाचे अध्यक्षपद भारत १ डिसेंबरपासून भूषवणार आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की भारत आणि प्रत्येक भारतीयासाठी ही फार मोठी संधी मिळाली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारताला ही जबाबदारी भूषवता येणार असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे. या सुसंधीचा चांगला उपयोग करून आपण विश्वकल्याणार्थ करुयात. विश्वशांती असो व एकात्मता, पर्यावरणाविषयी संवेदनशील जागृती असो किंवा शाश्वत विकासाची आव्हाने असोत, भारताकडे या सर्व आव्हानांना तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची क्षमता आहे. सर्वाचे कल्याण व्हावे, सर्वत्र शांतता व समृद्धी- समाधान नांदावे यासाठी भारत कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले.

तेलंगणातील हरिप्रसाद यांनी विणकामाद्वारे ‘जी-२०’चे बोधचिन्ह आपल्याला पाठवले आहे. ही माझ्यासाठी अनमोल भेट असल्याचे गौरवौद्गार काढून मोदी म्हणाले, की ‘जी-२०’संदर्भातील विविध कार्यक्रम येत्या काही दिवसांत देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येतील. या काळात जगातील विविध भागांतील महत्त्वाच्या व्यक्ती भारतातील विविध राज्यांना भेटी देतील. या काळात आपल्या राज्यांत येणारे विदेशातील नागरिक जरी त्या देशांचे प्रतिनिधी असतील तरी आगामी काळात ते आपल्या देशात पर्यटक म्हणून पुन्हा भेट देऊ शकतात, हे सर्वानी ध्यानात ठेवावे. आपण आपल्या संस्कृतीचे वैविध्य आणि खास वैशिष्टय़ांचे त्यांना दर्शन घडवू, याची मला खात्री आहे. ‘जी-२०’संदर्भातील उपक्रमांत कोणत्या ना कोणत्या मार्गाने जनतेने आणि विशेषत: तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.

खासगी उपग्रह प्रक्षेपकाचे यश अभिमानास्पद!

देशाच्या खासगी क्षेत्राने विकसित केलेले पहिले उपग्रह प्रक्षेपक गेल्या आठवडय़ात यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले, या यशाबद्दल अभिनंदन करून मोदींनी संबंधितांची प्रशंसा केली. ते म्हणाले, की या उपग्रह प्रक्षेपकाचे नाव ‘विक्रम-एस’ आहे. खासगी क्षेत्रातील स्वदेशी अवकाश तंत्रज्ञान नवउद्योगाची निर्मिती असलेल्या या पहिल्या उपग्रह प्रक्षेपकाने श्रीहरिकोटा येथून ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली. आता अवकाश क्षेत्रातील ही सेवा आपण इतर देशांनाही पुरवत आहोत. इतर देशांसोबत संयुक्त प्रकल्पही राबवत आहोत. गेल्या शनिवारीच भूतानसह भारताने विकसित केलेला उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. वैमानिकरहित ‘ड्रोन’ उत्पादनातही भारत लक्षणीय प्रगती करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G20 presidency big opportunity for india says narendra modi in mann ki baat zws
First published on: 28-11-2022 at 03:15 IST