Bhopal Garba Non Hindu Entry : मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये गरबा कार्यक्रमादरम्यान गैर-हिंदूंनी प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी एक अनोखा प्रकार केला असल्याची माहिती समोर आली आहे. भोपाळमधील श्री कृष्ण सेवा समितीने गरबाच्या मंडपात प्रवेश करणाऱ्यांसाठी गंगाजल पिण्याची आणि गोमूत्र शिंपडण्याचं बंधन घातल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, येथील आयोजकांचा दावा आहे की या उपाययोजना करण्यामागचा उद्देश धार्मिक पवित्रता राखणं आणि गैर-हिंदूंचा प्रवेश मर्यादित करणं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आंब्याच्या पानांमधून गंगाजल दिलं जातं आणि गंगाजल व गोमूत्र शिंपडण्याशिवाय गरब्याच्या मंडपात प्रवेश दिला जात नाही. तसेच या ठिकाणी येणाऱ्या महिला आणि मुलांसह पर्यटकांच्या कपाळावर तिलक लावून जय श्री राम असा जयघोष करून स्वागत केलं जातं. त्यानंतर गंगाजल अर्पण केलं जातं आणि पूजा क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्यावर गोमूत्र शिंपडलं जातं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत तेथील समितीने म्हटलं की उत्सवादरम्यान स्थळाची पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी हा प्रकार करण्यात येत आहे. समितीचे सदस्य ठाकूर यांनी या प्रकाराचं समर्थन केलं आणि म्हटलं की, “त्यांचा उद्देश कोणालाही वैयक्तिकरित्या टार्गेट करण्याचा नाही तर आध्यात्मिक शुद्धता जपणे हा आहे. आम्हाला वाटतं की येथे प्रवेश करणाऱ्याचे मन शुद्ध असावं आणि श्रद्धा पूर्ण व्हावी.”
येथील फुटेजमध्ये भाविक सक्रियपणे विधीत सहभागी होताना, गंगाजल पिताना, टिळक लावताना आणि गोमुत्र शिंपडताना दिसत आहेत. अनेक उपस्थितांनी या विधीचं कौतुक केलं आहे. “गंगाजलाचा एक थेंब देखील मन शुद्ध करतो. हा विधी आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे”, असं एका भक्ताने म्हटलं. तर दुसऱ्याने हा अनुभव भाग्यवान आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत करणारा असल्याचं वर्णन केलं. दरम्यान, याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींनी गोमूत्र शिंपडण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.