Gautam Adani explained Adani Defence role in Operation Sindoor Video : अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी मंगळवारी अदानी डिफेन्स कंपनीने ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचे म्हटले आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यावेळी अदाणी यांनी भारतीय लष्कराच्या प्रयत्नाचे कौतुक देखील केले, तसेच अदाणी डिफेन्सचे ड्रोन आणि अँटी-ड्रोन सिस्टम हे या मोहिमेदरम्यान आघाडीवर तैनात होते असेही नमूद केले. अदाणी समूहाच्या शेअरहोल्डर्सच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (AGM) संबोधित करताना गौतम अदाणी बोलत होते.
गौतम अदाणी म्हणाले की, “जेव्हा अदाणी डिफेन्सचा प्रश्न येतो तेव्हा – ऑपरेशन सिंदूरने मागणी केली आणि आम्ही ती पूर्ण केली. आमचे ड्रोन हे आकाशातील डोळे, याबरोबरच हल्ल्यात तलवारी बनले आणि आमच्या अँटी ड्रोन सिस्टीम्सनी आपले सैन्य आणि नागरिकांचे संरक्षण करण्यात मदत केली. जसे मी नेहमीच मानत आलो आहे की, आम्ही ‘सेफ झोन’मध्ये काम करत नाहीत. जे महत्त्वाचे असेल- जेथे भारताला आमची सर्वाधिक गरज आहे तेथे आम्ही काम करतो,” असे अदानी म्हणाले.
“या वर्षी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान गणवेशातील जवान खंबीरपणे उभे राहिले. प्रसिद्धी, पदकांसाठी नाही- तर कर्तव्यासाठी,” असेही गौतम अदाणी म्हणाले.
“त्यांच्या धाडसाने आम्हाला आठवण करून दिली की शांतता ही फुकटात मिळत नाही. ती कमावलेली आहे. आणि स्वप्न पाहण्याचे, साकारण्याचे आणि नेतृत्व करण्याचे स्वातंत्र्य हे जे रक्षण करतात त्यांच्या खांद्यावर भक्कमपणे उभे राहिले आहे,” असे अदाणी म्हणाले. ऑपरेशन सिंदूरचा दाखला देत आजणी म्हणाले की भारताला शांततेची किंमत माहिती आहे, “पण जर कोणी आम्हाला डोळे दाखवत असेल तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर कसे द्यायचे हे आम्हाला ठावूक आहे.”
त्यांचा उद्देश फक्त उद्योग उभे करणे आणि बाजारपेठेला पुरवठा करत राहणे हा नसून, नवीन शक्यता निर्माण करणे आणि देशाच्या भवितव्याची सेवा करणे हा देखील आहे, यावर देखील अदाणी यांनी यावेळी देखील भर दिला.
ऑपरेशन सिंदूर
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २२ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यादरम्यान भारतीय लष्कराने १० मे रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून सीमेवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत जागोजागी हल्ले करण्यात आले होते.