सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते काँग्रेस, शिवसेना नेत्यांपर्यंत सगळ्यांनीच या घटनेचा निषेध नोंदवला. दरम्यान या घटनेमुळे जगातल्या आणि देशातल्या नेत्यांच्या बाबतीत बूट फेकीच्या घटना घडल्या आहेत त्याबाबत आपण जाणून घेऊ.

जॉर्ज बुश

१४ डिसेंबर २००८ च्या दिवशी जॉर्ज बुश हे पत्रकार परिषद घेत होते. ही पत्रकार परिषद बगदाद या ठिकाणी सुरु होती. तिथे जॉर्ज बुश यांच्यावर इराकी पत्रकार मुंतधर झैदी याने बूट भिरकावला. This is a Farewell Kiss From Iraqi People, you Dog असं हा पत्रकार तेव्हा ओरडला होता.

Geroge Bush
जॉर्ज बुश हे पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. तेव्हा त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. (संग्रहीत फोटो)

या प्रकरणात झैदीला तीन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा झाली. मात्र त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला ९ महिन्यांनी तुरुंगातून मुक्त करण्यात आलं. त्याने फेकलेला बूट जप्त करण्यात आला आणि नष्ट करण्यात आला.

हिलरी क्लिंटन

हिलरी क्लिंटन यांच्यावर १० एप्रिल २०१४ ला बूट हल्ला करण्यात आला. हिलरी क्लिंटन या लास वेगास या ठिकाणी बोलत होत्या. त्यावेळी एका महिलेने त्यांच्यावर बूट भिरकावला. त्यानंतर या महिलेला ताब्यात घेण्यात आलं आणि समज देऊन सोडण्यात आलं.

hillary clinton
हिलरी क्लिंटन यांच्यावर एका महिलेने बूट फेकल्याची घटना घडली होती. (फोटो-PTI)

लालकृष्ण आडवाणींवर २००९ मध्ये बूटफेक

२००९ मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भाजपाचे पंतप्रधानपदाचे प्रमुख उमेदवार असलेल्या आडवाणी यांच्यावर भाजपाच्याच एका माजी पदाधिकाऱ्याने लाकडी चप्पल फेकली होती. पवन अग्रवाल नावाच्या या व्यक्तीने अडवाणी यांना ‘खोटा लोहपुरुष’ म्हटलं होतं.

Lalkrishna Advani
लालकृष्ण आडवाणी यांच्यावर २००९ मध्ये एकाने बूट फेकला होता. त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली होती. (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)

मनमोहन सिंग सभेला संबोधित करत असताना बुटफेकीची घटना

एप्रिल २००९ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग अहमदाबादमधील एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांच्या दिशेने फेकलेला बूट खूप दूर पडला. बूट फेकणारा एक अभियांत्रिकी विद्यार्थी होता, त्याला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतले. परंतु, सिंग यांनी त्याला माफ करायचा निर्णय घेतल्याने त्याची सुटका करण्यात आली. या विद्यार्थ्याने कोणत्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नसल्याचे सांगितलं होतं.

Manmohan Sing
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही बूट फेकण्यात आला. मात्र ज्याने बूट फेकला त्या विद्यार्थ्याला सिंग यांनी क्षमा केली. (फोटो-संग्रहीत)

पी चिदंबरम यांच्यावरही २००९ मध्ये बूट फेक

२००९ मध्ये पत्रकार जरनैल सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर बूट फेकला. १९८४ च्या शीख दंगलीतील आरोपी आणि काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना सीबीआयने ‘क्लीन चिट’ दिल्यामुळे ते संतप्त झाले होते. या पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले होते, परंतु नंतर त्याचीही सुटका करण्यात आली.

p Chidambaram
पी. चिदंबरम यांच्यावरही बूट फेकल्याची घटना घडली होती. (Image Source: Twitter)

ओमर अब्दुल्लांवर बूट फेकण्यात आल्याची घटना

१५ ऑगस्ट २०१० रोजी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान बूट फेकण्यात आला. आक्रमक व्यक्ती सामान्य तरुण नसून एक पोलिस हवालदार असल्याने सुरक्षेतील त्रुटीच्या भीतीला यामुळे वाव मिळाला

Omar Abdullah statement on pahalgam terror attack
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर २०१२ मध्ये बूट फेकण्याची घटना घडली होती.

निवडणूक सभेच्या दरम्यान राहुल गांधींवर फेकण्यात आला बूट

जानेवारी २०१२ मध्ये देहरादूनमध्ये एका निवडणूक सभेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. राहुल गांधी हे त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. या घटनेनंतर राहुल गांधींवर बूट फेकणाऱ्या इसमाला ताब्यात घेण्यात आलं होतं.

Rahul Gandhi
राहुल गांधी २०१२ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता.

अरविंद केजरीवाल यांच्यावरही फेकण्यात आला बूट

९ एप्रिल २०१६ रोजी अरविंद केजरीवाल सम-विषम योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करत असताना एका राजकीय कार्यकर्त्याने त्यांच्या दिशेने बूट फेकला. बूट फेकणाऱ्या वेद प्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीचा संबंध ‘आम आदमी पार्टी’च्या एका फुटीर गटाशी होता. त्याला ताब्यात घेण्यापूर्वी, त्याने सम-विषम योजना हा ‘सीएनजी घोटाळ्या’चा भाग असल्याचा आरोप केला होता.

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्यावरही बूट फेकला गेल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती.

भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर त्या वकिलाला ताब्यातही घेण्यात आलं. मात्र मी या घटनेने विचलित झालेलो नाही असं गवई यांनी म्हटलं. तसंच सदर वकिलाला सोडून द्या, कारवाई करु नका असंही गवई यांनी म्हटलं आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेने देशातील आणि जगातील नेत्यांना कसं बूट फेकून टार्गेट करण्यात आलं त्या घटनांची आठवण ताजी झाली आहे.