PM Modi Gifts : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येत आहे. या लिलावाला आजपासून (२४ सप्टेंबर) सुरूवात झाली असून मोदींना मिळालेल्या पेंटिंग, शाल, शिल्प, क्रीडा स्मृतिचिन्हे यासह आदी भेटवस्तूंचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी नागरिकांना या लिलावात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

गेल्या काही वर्षात पंतप्रधान मोदी यांना अधिकृत कार्यक्रमांदरम्यान मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावामधून मिळालेले पैसे गंगा नदीची स्वच्छता आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘नमामी गंगे’ प्रकल्पासाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?

“गेल्या काही दिवसांपासून माझ्या विविध कार्यक्रमांदरम्यान मला मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव सुरू आहे. या लिलावात भारताची संस्कृती आणि सर्जनशीलता दर्शविणारी अतिशय चांगल्या वस्तूंचा समाविष्ट आहेत. या लिलावातून मिळणारे पैसे ‘नमामी गंगे’ला दिले जातील. त्यामुळे नागरिकांनी या लिलावात सहभागी व्हावं.”

दरम्यान, सांस्कृतिक मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टद्वारे (एनजीएमए) आयोजित पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावाची घोषणा केली होती. ज्यामध्ये केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी संग्रहाचं अनावरण केलं होतं.

पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं होतं की, “१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालणाऱ्या या ऑनलाईन लिलावात १,३०० हून अधिक भेटवस्तू असणार आहेत. त्यामध्ये पेंटिंग, शाल, कलाकृती, शिल्पे, देव-देवतांच्या मूर्ती आणि क्रीडा स्मृतिचिन्हे यांचा समावेश असणार आहे. या वस्तू भारताची सांस्कृतिक विविधता आणि सर्जनशीलता प्रतिबिंबित करतात. त्यामुळे नागरिक या अनोख्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात”, असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा याआधी जानेवारी २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारला आहे. आता देखील या लिलावामधून मिळालेले पैसे हे नमामी गंगे प्रकल्पासाठी देण्यात येणार आहेत.