पश्चिम आशियात शांततेसाठी एक नवा प्रस्ताव पुढे आला असून, युद्धविरामासाठी अमेरिका आणि इस्रायलवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे. गाझा आणि पश्चिाम किनारपट्टीवरून इस्रायलची माघारी, हमास संघटनेवर बंदी आणि एकत्रित पॅलेस्टाइन देशाची स्थापना असा हा नवा शांततेचा प्रस्ताव या आठवड्यात तयार करण्यात आला आहे.
न्यूयॉर्कमध्ये २९ जुलै रोजी हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, यासाठी नियोजित उच्च स्तरावरील परिषदेला युरोपीय संघ, अरब लीग यांच्यासह १७ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आशियातील इंडोनेशिया, आफ्रिकेतून सेनेगल आणि अमेरिका खंडातून ब्राझील, कॅनडा आणि मेक्सिको या देशांचा समावेश होता. या परिषदेला इस्रायल आणि अमेरिका दोन्ही देश अनुपस्थित होते.
ठरावामुळे गाझामधील सद्यास्थिती बदलणार नसली, तरी इस्रायलवर दबाव टाकण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे अरब देशांनी प्रथमच हमास संघटनेला नि:शस्त्र करून त्यावर बंदी घालावी, यास मान्यता दिली आहे.