गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि शिवसेना उतरणार असल्याने रंगत वाढली आहे. गोव्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणारी थेट लढत यामुळे रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र तृणमूल काँग्रेस आणि आपमुळे बिगरभाजपा पक्षांना नुकसान होत भाजपालाच फायदा होईल असा दावा काँग्रेस नेते करत आहेत. यावरुन आपचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टोला लगावला आहे.

देशातील सर्वात जुना पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा आशास्थान आहे, गोव्यातील लोकांचा नाही असा टोला अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला लगावला आहे.

“मला वाटलं मोदी मंत्रिमंडळातील हा कार्यक्षम मंत्री…,” गडकरी भेटीनंतर संजय राऊत रोखठोकच बोलले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी गोव्यातील जनतेला आवाहन करताना योग्य शासनाची निवड करत काँग्रेसला मदत देण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा आधार घेत म्हटलं होतं की, “गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष बिगरभाजपा मतांना खंडित करेल असा माझा अंदाज आहे. केजरीवालांनीही हे मंजूर केलं आहे. गोव्यात सामना काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे”.

केजरीवाल यांनी निवडणुकीत स्पष्ट जनादेश मिळाला नाही तर त्यांचा पक्ष गोव्यातील आघाडी सरकारचा भाग होण्यास तयार आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पी चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या ट्विटला अरविंद केजरीवाल यानी उत्तर दिलं आहे.

केजरीवाल म्हणाले की, “रडगाणं बंद करा सर…जिथे आशा आहेत त्यांना जनता मत देईल. काँग्रेस भाजपासाठी आश्वास्थान आहे, गोव्यातील जनतेसाठी नाही. तुमच्या १७ पैकी १५ आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसचं प्रत्येक मत भाजपाला जाईल याची खात्री बाळगत आहे. भाजपाला मत देण्यासाठी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला जात आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोव्याच्या एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. १० मार्चला मतमोजणी होणार आहे.