राज्याच्या किनारी पट्टय़ात डान्स बार चालविणाऱ्यांविरोधात तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी येथे दिला.
किनारी भागात काय उद्योग चालले आहेत, याची आपल्याला माहिती मिळाली असून त्याविरोधात योग्य ती कारवाई करण्याच्या दिशेने आपण उपाययोजना सुरू केली आहे, असे पार्सेकर यांनी सांगितले.
गेल्या आठवडय़ात कलंगुट येथील भाजपचे आमदार मायकेल लोबो यांच्या कथित नेतृत्वाखाली आंदोलकांच्या एका गटाने कलंगुट बागा किनारपट्टीवर डान्स बार सुरू असल्याचा आरोप करून तेथील दोन गाळे उद्ध्वस्त केले होते. याखेरीज याच भागात सुरू असलेला वेश्या व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी लोबो यांनी २३ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचे उपोषण करून बैठा सत्याग्रहही केला होता. ही ठिकाणे पर्यटकांच्या दृष्टीने लोकप्रिय असून तेथे काही गैरप्रकार सुरू असतील तर त्याविरुद्ध कारवाई सुरू करण्याचा इशारा पार्सेकर यांनी दिला. मी काय कारवाई करीन, हे आता सांगणार नाही, परंतु त्याला सुरुवात झाली आहे, हे खात्रीपूर्वक सांगू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या आठवडय़ात ज्या गटाने बारचे गाळे उद्ध्वस्त केले, त्यांचे नेतृत्व लोबो यांनी केल्याचे सीसीटीव्हीवरील दृश्यांमध्ये दिसून येत असल्याचा आरोप संबंधित बारमालकांनी केला. तर आंदोलक प्रचंड संतापलेले असल्यामुळे त्यांना काबूत आणण्यासाठी आपण तेथे गेलो असल्याचा दावा लोबो यांनी केले.