शाळांमधील शिकवण्याची भाषा या मुद्द्यावरून गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी तेथील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर कडाडून टीका केली. शाळांमध्ये प्रादेशिक भाषेतूनच शिकविण्यात येईल, असे आश्वासन दिल्यामुळेच २०१२ मध्ये लोकांनी भाजपला निवडून दिले होते. पण या नेत्यांनी लोकांचा विश्वासघात केला. पुढील निवडणुकीवेळी त्यांना दारासमोर उभेही करू नका, असे वेलिंगकर यांनी एका कार्यक्रमात सांगितले. उत्तर गोव्यामध्ये भारतीय भाषा सुरक्षा मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना वेलिंगकर यांनी भाजप सरकारवर टीका केली. विशेष म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंद्रेम मतदारसंघातच हा कार्यक्रम घेण्यात आला.
मराठी आणि कोकणी भाषेतील शाळांसाठी १२ वेगवेगळे भत्ते देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. सत्तेवर आल्यानंतर चार वर्षांनी हे भत्ते सुरू करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. पण या भत्त्यांसाठी एकही रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. केवळ मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी हे आश्वासन देण्यात आले होते, असे वेलिंगकर म्हणाले. राज्यामध्ये भाजपची घसरण सुरू होण्याला पक्षाचे नेतेच जबाबदार आहेत. गोव्यातील लोकांनी उत्स्फूर्तपणे हे आंदोलन सुरू केले आहे. आम्ही कोणत्याही स्थिती खोटं बोलणं खपवून घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2016 रोजी प्रकाशित
अविश्वासू भाजप नेत्यांना निवडणुकीवेळी दारासमोर उभेही करू नका, संघाच्या नेत्याने सुनावले
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंद्रेम मतदारसंघातच हा कार्यक्रम घेण्यात आला
Written by वृत्तसंस्था
First published on: 25-04-2016 at 11:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa rss unit chief criticises state govt over language issue