Gopal Khemka Shot Dead Case : बिहारमधील पाटणामध्ये ४ जुलै रोजी प्रसिद्ध व्यावसायिक गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर बिहारमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच एका उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी गोपाल खेमका यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचलेल्या रोशन कुमार या संशयिताला ताब्यात घेतलं होतं. यानंतर गोपाल खेमकांच्या हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

गोपाल खेमका यांच्या हत्येशी संबंधित एक प्रमुख आरोपी मंगळवारी (८ जुलै) सकाळी पोलीस चकमकीत ठार झाला आहे. पाटणा शहरातील मल सलामी परिसरातून आरोपीला पोलीस अटक करत असताना झालेल्या चकमकीत हा आरोपी ठार झाला आहे. रोपी विकास उर्फ ​​राजा असं या आरोपीचं नाव आहे. तो आरोपी बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या निर्मिती आणि विक्रीमध्ये सहभागी होता. तसेच गोपाळ खेमका यांच्या हत्या प्रकरणात या आरोपीने कट रचल्याचा पोलिसांना संशय होता. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी राजा याने खेमकाच्या हत्येसाठी शस्त्र पुरवले होते. गोपाळ खेमकाच्या हत्येच्या वेळी आरोपी राजा हा गोळीबार करणाऱ्या उमेशबरोबर होता असंही पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, झालेल्या चकमकीत हा आरोपी ठार झाला त्या घटनास्थळावरून एक पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीने पोलिसांवर हल्ला करण्याता प्रयत्न केल्यानंतर झालेल्या चकमकीत आरोपी ठार झाला आहे. तसेच आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटणा येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

गोपाल खेमकांच्या हत्येतील संशयित आरोपीचा अंत्ययात्रेत सहभाग

६ जुलै रोजी गोपाल खेमका यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असताना एका व्यक्तीवर पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार गोपाल खेमका यांच्या हत्येच्या घटनेत रोशन हा सहभागी आहे का? याची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणाशी संबंधित आतापर्यंत एक डझन जणांची पोलिसांनी चौकशी करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या तपासात असं दिसून आलं आहे की गोपाल खेमका यांची हत्या ही पूर्वनियोजित होती.

गोपाळ खेमका कोण होते?

गोपाळ खेमका बिहारमधील आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक होते. पाटणामधील मगध रुग्णालयाचे ते मालक होते. सोबतच पाटणामध्ये त्यांची अनेक औषधांची दुकाने आहेत. त्याव्यतिरिक्त हाजूपीर येथे त्यांच्या दोन कार्डबोर्ड तयार करण्याच्या फॅक्टरी आहेत. पाटणाच्या एक्झिबिशन रोडवर त्यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे, तसेच हाजीपूर इंडस्ट्रियल परिसरातही त्यांच्या फॅक्टरी आहेत. तसेच त्यांचे इतरही अनेक उद्योग आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी रात्री उशिरा गोपाळ खेमका बांकीपूर क्लबमधून परतत असताना गांधी मैदान इथल्या ट्विन टॉवर अपार्टमेंटमध्ये जात होते. त्याआधी ते कारमधून बाहेर पडले असता, आधीच त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या दोन बाइकस्वारांनी थेट त्यांच्या डोक्यात गोळी घातली. गोळी लागताच गोपाळ खेमका जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूच्या स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले; मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.