सामाजिक ध्रुवीकरणातून भारतीय जनता पक्षाचा राजकीय पाया रुंदावणारे नेते गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी पहाटे नवी दिल्लीत अपघाती निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. विद्यार्थी चळवळीत असतानाच आणीबाणीविरोधी संघर्षांत उडी घेऊन मुंडे यांनी राजकीय कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. त्यानंतर राजकारणाचे गुन्हेगारीकरण, ग्रामीण भागांतील प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, एन्रॉन प्रकल्प अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आणि सत्ताधाऱ्यांना थेट भिडत मुंडे यांनी तळागाळापर्यंत भाजपचा झेंडा रोवला. मुंडे आक्रमक होते, पण आक्रस्ताळी नव्हते. राजकीय भूमिकेशी एकनिष्ठ होते, पण एकांगी नव्हते. गरीब, मागास शेतकरी कुटुंबात जन्मल्यापासून जगण्याची लढाई सुरू झाली आणि समाज हेच कुटुंब झाल्यावर ती दिवसांगणिक व्यापकही झाली. एका लढवय्याची ही झुंज मंगळवारी अचानक थांबली आहे. बुधवारी परळीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, तेव्हा समाजाच्या भल्याचे स्वप्न आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक लढय़ात देह झोकून देणाऱ्या या लढवय्याची दृश्यातली अंतिम खूणही काळाच्या कवेत नजरेआड होत कायमची विसावेल..

महाराष्ट्रातील लोकनेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी सकाळी नवी दिल्लीत अपघाती निधन झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या निधनाबद्दल माहिती दिली. मुंडे यांच्या अकाली निधनाने देशाच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे.
सकाळी सहा वाजता मुंबईकडे रवाना होण्यासाठी मुंडे आपल्या सहायकासोबत नवी दिल्ली विमानतळाच्या दिशेने जात असताना पृथ्वीराज मार्गावर त्यांच्या गाडीला इंडिका मोटारीने जोरदार धडक दिली. या अपघातात मुंडे जखमी झाले. त्यानंतर त्यांना लगेचच उपचारांसाठी नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेत असतानाच मुंडे यांना हृद्यविकाराचा झटकाही आला. त्यामुळे उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी त्यांचा श्वासोच्छवास चालू नव्हता. त्यांचा रक्तदाबही लागत नव्हता आणि ह्रदयक्रियाही बंद होती. डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर तातडीने आपत्कालिन उपचार सुरू केले. मात्र, त्यांच्या शरीराने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती ‘एम्स’चे डॉ. अमृत गुप्ता यांनी पत्रकारांना दिली. मुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱया इंडिका गाडीच्या चालकाला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनास्थळावर पोलिसांकडून पाहणी करण्यात आली आहे. गुरजिंदर सिंग असे इंडिका चालकाचे नाव आहे. तो इम्पेरियल हॉटेलमध्ये काम करतो.

परळीमध्ये होणार अंत्यसंस्कार
गोपीनाथ मुंडे याचे पार्थिव मंगळवारी दुपारी एक वाजता काही तासांसाठी दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला नेण्यात येईल. मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील वरळीतील मुंडे यांच्या निवासस्थानी आणि नंतर भाजपच्या प्रदेश कार्यालयात  त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.  बुधवारी सकाळी सात वाजता विमानाने पार्थिव लातूरला नेण्यात येईल आणि त्यानंतर गाडीने ते परळीला आणण्यात येईल. परळीमध्ये दुपारी साडेचार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. 

माझा अत्यंत जवळचा सहकारी आणि मित्र आज मी गमावला असल्याचे दु:ख आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने आज देशाचे आणि सरकारचे मोठे नुकसान झाले आहे. तळागळातील जनमताला उत्तमरित्या ओळखणारा खंदा नेता आज मी गमावला. मुंडेजींच्या कुटुंबियांचा दु:खात मी सहभागी आहे
– पंतप्रधान नरेंद्र मोदी</strong>

एक झुंज संपली..
नवी दिल्ली : सामाजिक ध्रुवीकरणातून भारतीय जनता पक्षाचा राजकीय पाया रुंदावणारे नेते गोपीनाथ मुंडे यांचे मंगळवारी पहाटे नवी दिल्लीत अपघाती निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. विद्यार्थी चळवळीत असतानाच आणीबाणीविरोधी संघर्षांत उडी घेऊन मुंडे यांनी राजकीय कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. त्यानंतर राजकारणाचे गुन्हेगारीकरण, ग्रामीण भागांतील प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, एन्रॉन प्रकल्प अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आणि सत्ताधाऱ्यांना थेट भिडत मुंडे यांनी तळागाळापर्यंत भाजपचा झेंडा रोवला. मुंडे आक्रमक होते, पण आक्रस्ताळी नव्हते. राजकीय भूमिकेशी एकनिष्ठ होते, पण एकांगी नव्हते. गरीब, मागास शेतकरी कुटुंबात जन्मल्यापासून जगण्याची लढाई सुरू झाली आणि समाज हेच कुटुंब झाल्यावर ती दिवसांगणिक व्यापकही झाली. एका लढवय्याची ही झुंज मंगळवारी अचानक थांबली आहे. बुधवारी परळीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, तेव्हा समाजाच्या भल्याचे स्वप्न आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक लढय़ात देह झोकून देणाऱ्या या लढवय्याची दृश्यातली अंतिम खूणही काळाच्या कवेत नजरेआड होत कायमची विसावेल..