पीटीआय, नवी दिल्ली
ईशान्य भारतात अभूतपूर्व प्रगती होत आहे. त्या प्रगतीला अधिक वेग देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. येथे पार पडलेल्या ‘रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट’मध्ये (उदयोन्मुख उत्तर पूर्व गुंतवणूकदार परिषद) मोदी यांच्या हस्ते दोनदिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.
ईशान्य भारताचे वैविध्य हेच त्याचे सर्वात मोठे सामर्थ्य. विकासाचा आघाडीचा प्रदेश म्हणून तो उदयास येत आहे. ईशान्य भारत अभूतपूर्व प्रगती अनुभवत आहे. आम्ही त्या प्रगतीस गती देण्यास कटिबद्ध आहोत,’’ असे मोदी या वेळी म्हणाले. उद्घाटन सत्राला ईशान्येतील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उच्च अधिकारी, राजनैतिक प्रतिनिधी आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. तसेच उद्याोगक्षेत्रातील दिग्गज मुकेश अंबानी, गौतम अदानी, अनिल अग्रवाल यांचाही या सहभाग होता.
दहा हजारांहून अधिकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला
गेल्या दशकात ईशान्य भारतातील १० हजारपेक्षा अधिक तरुणांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद याबाबतीत शून्य सहनशीलतेची नीती सरकार पाळत असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले.
ही परिषद ईशान्य भारताला संधींचा प्रदेश म्हणून अधोरेखित करणे, देशांतर्गत व जागतिक गुंतवणूक आकर्षित करणे, प्रमुख हितधारक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांना एकाच व्यासपीठावर आणणे हा उद्देश घेऊन आयोजित केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुंतवणूक प्रोत्साहनासाठी केंद्रित क्षेत्रे
परिषदेमध्ये मंत्री स्तरावरील सत्रे, व्यवसाय व सरकार यांच्यातील चर्चा, व्यवसाय-ते-व्यवसाय बैठका, स्टार्टअप्सचे सादरीकरण आणि राज्य तसेच केंद्र सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहनाच्या धोरणांचे प्रदर्शन होणार आहे. तसेच गुंतवणूक प्रोत्साहनासाठी लक्ष केंद्रित केलेल्या क्षेत्रांत पर्यटन आणि आतिथ्य, कृषी- अन्न प्रक्रिया व संबंधित क्षेत्रे, वस्त्रोद्याोग, हातमाग आणि हस्तकला, आरोग्यसेवा, शिक्षण व कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान व माहिती सेवा, पायाभूत सुविधा, ऊर्जा, मनोरंजन आणि क्रीडा आदींचा समावेश आहे.
सरकारसाठी ‘ईस्ट’ म्हणजे – सक्षमीकरण (एम्पॉवर), क्रिया (अॅक्ट), बळकट करणे (स्ट्रेंग्थन) आणि परिवर्तन (ट्रान्सफॉर्म). कधीकाळी ईशान्य भारताला फक्त सीमावर्ती प्रदेश मानले जात होते, आता तो विकासाचा आघाडीदार आहे. एकेकाळी ईशान्य भारत म्हणजे स्फोटक, बंदुका आणि क्षेपणास्त्रे यांचा प्रदेश मानला जात असे, ज्यामुळे अनेक तरुणांची संधी हिरावून घेतली गेली. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान