नवी दिल्ली : सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या करोनावरील कोव्होव्हॅक्स या लशीला विभिन्न वर्धक मात्रा म्हणून परवानगी देण्याबाबत केंद्रीय औधष नियामक प्राधिकरणाची (सीडीआरए) तज्ज्ञ समिती बुधवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

ज्या प्रौढांनी कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांना विभिन्न वर्धक मात्रा म्हणून कोव्होव्हॅक्सची मात्रा देणे प्रस्तावित आहे. केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) विषय तज्ज्ञ समितीची ही बैठक ११ जानेवारीला होणार आहे.

सीरमचे संचालक प्रकाश कुमार यांनी देशाच्या औषध नियंत्रकांना पत्र लिहिले असून त्यात या लशीला विभिन्न वर्धक मात्रा म्हणून मंजुरी देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी काही देशांत करोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी काही अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. प्रौढ, १२ ते १७ वर्षे आणि ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुले यांच्यासाठी ही परवानगी दिलेली आहे. सीरमने या लशीची निर्मिती नोव्हाव्हॅक्सकडून तंत्रज्ञान मिळवून केली आहे. या लशीला जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी १७ डिसेंबर २०२१ रोजी परवानगी दिली होती.