Greater Noida Man Assaults Woman : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये एका तरुणाने भर रस्त्यात तरुणीला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. शहरातील दादरी परिसरात शुक्रवारी (१ नोव्हेंबर) रात्री ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून याप्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंदवला आणि आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की आरोपी तरुण व पीडित तरुणी दोघेही एकमेकांना ओळखतात. दोघेची एकाच महाविद्यालयात शिकतात. दादरी पोलीस ठाणे परिसरातील ओमॅक्स पाम ग्रीन सोसायटीत राहणाऱ्या आरोपी तरुणाने त्याच्या मैत्रिणीला सोसायटीच्या आवारातच मारहाण केली. त्याने तिचे केस धरून कानशीलात लगावली. हा तरुण त्याच्या मैत्रिणीला मारहाण करत असल्याचं पाहून आजूबाजूचे पादचारी व सोसायटीमधील रहिवाशांनी मध्यस्थी करून तरुणीला त्याच्या तावडीतून सोडवलं.

दरम्यान, हा तरुण त्याच्या मैत्रिणीला मारहाण करत असताना घटनास्थळावर कोणीतरी या मारहाणीचा व्हिडीओ चित्रीत करून व्हायरल केला. त्यामुळे ही घटना पोलिसांपर्यंत पोहोचली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. १८ सेकंदांच्या या व्हिडीओत दिसतंय की तरुणाने एका मुलीचे केस पकडले आहेत व तो तिला मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला ताब्यात घेतलं आहे.

हे ही वाचा >> Kishanganj : बिहारच्या किशनगंजमध्ये गूढ आजाराने ३ मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक, गावात पसरलं घबराटीचं वातावरण

मारहाणीचं कारण काय?

सूर्या भडाना असं याप्रकरणी अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो ग्रेटर नोएडातील ओमॅक्स पाम ग्रीन सोसायटीमध्ये एका भाड्याच्या घरात राहतो. सूर्याची याच सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणीशी मैत्री झाली होती. दोघेही एकाच महाविद्यालयात शिकतात. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यामुळे सूर्या भडानाने तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिला शिवीगाळही केली. सोसायटीमधील काही लोकांनी या मारहाणीचा व्हिडीओ चित्रीत केला. त्यानंतर हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. दादरी पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेत सूर्याला अटक केली आहे.

हे ही वाचा >> इथे माणुसकी मेली! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस काय म्हणाले?

दादरी पोलिसांनी सांगितलं की व्हिडीओची दखल घेत आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल.