GST संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर सध्या जोरदार चर्चा चालू आहे. १२ टक्के जीएसटीची श्रेणीच केंद्र सरकारने रद्द केली असून रोजच्या जीवनातील अनेक वस्तूंवरील जीएसटी थेट ५ टक्क्यांवर आणला आहे. तसेच, काही वस्तूंवरचा जीएसटी १८ टक्क्यांच्या श्रेणीमध्ये कायम ठेवण्यात आला आहे. या बदललेल्या रचनेनुसार काही गोष्टी स्वस्त तर काही गोष्टींच्या किमती जैसे थे असणार आहेत. स्वस्त झालेल्या वस्तूंमध्ये पनीर, पिझ्झा, ब्रेड, सुकामेवा, आईसक्रीम अशा खायच्या वस्तूंसोबतच टीव्ही, एसी, वॉशिंग मशीनसारख्या घरगुती वापराच्या वस्तूही स्वस्त झाल्या आहेत. पण या सगळ्या चर्चांमध्ये अगदी सामान्यांपासून सगळ्यांच्या हातात असणाऱ्या मोबाईल फोनचा मात्र कुठेच उल्लेख दिसत नाही.

एकीकडे घरगुती वापराच्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंना १२ टक्क्यांच्या जीएसटी श्रेणीतून ५ टक्क्यांच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेलं असताना मोबाईलसंदर्भात नेमका जीएसटी प्रणालीनुसार काय बदल झालेला आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे अगदी सामान्य घरांपासून ते अतीश्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात हल्ली मोबाईल हा एक अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे मोबाईलच्या दरांसंदर्भात होणारे बदल हे सामान्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम करत असतात. त्यामुळे Apple, Samsung, Xiomi, Redmi, OnePlus, Oppo अशा विविध कंपन्यांच्या मोबाईल फोनच्या चाहत्यांसाठी जीएसटीमधील हे बदल कमालीची उत्सुकता निर्माण करणारे ठरले.

फक्त मोबाईल नव्हे, लॅपटॉपही महत्त्वाचा!

दरम्यान, मोबाईल युजर्सप्रमाणेच लॅपटॉपच्या खरेदीदारांची संख्याही देशात मोठी आहे. एकीकडे वैयक्तिक वापरासाठी लॅपटॉपची खरेदी करण्याचे प्रमाण वाढले असताना दुसरीकडे व्यावसायिक वापरासाठीही कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर लॅपटॉप खरेदी केले जातात. शिवाय, शैक्षणिक पद्धतीमध्ये ऑनलाईन क्लासेससारख्या नव्या बदलांमुळे विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदीचं प्रमाणदेखील वाढलं आहे. त्यामुळे लॅपटॉप खरेदीदारांसाठीही जीएसटीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता.

स्लॅब बदलूनही पदरी निराशाच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी संध्याकाळी जीएसटीसंदर्भात देशवासीयांना उद्देशून केलेल्या संवादामध्ये ‘बचत उत्सवा’ला सुरुवात झाल्याचं जाहीर केलं. त्यानुसार २२ सप्टेंबरपासून GST मधील नवे बदल लागूही झाले. पण १२ टक्क्यांचा जीएसटी स्लॅब ५ टक्क्यांपर्यंत कमी करूनही स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या खरेदीदारांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. कारण इतर सर्व गोष्टींच्या जीएसटी दरांमध्ये आणि पर्यायाने त्याच्या किमतींमध्ये बदल झाले असले, तरी या दोन वस्तूंवरील जीएसटीमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन व लॅपटॉपच्या दरांवर आधीप्रमाणेच १८ टक्के जीएसटी लागू असेल.

GST चा लाभ नसला, तरी ऑफर्सचा फायदा!

दरम्यान, जीएसटीमधील दरकपातीचा कोणताही लाभ मोबाईल वा लॅपटॉपच्या खरेदीदारांना होणार नसला, तरी वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर जाहीर करण्यात आलेल्या ऑफर्सचा अशा ग्राहकांना फायदा होऊ शकेल. त्यामध्ये Amazon Great indian Festival आणि Flipkart Big Billion Day या ऑफर्स जीएसटी लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून म्हणजेच २३ सप्टेंबरपासून या ऑफर्सचा लाभ खरेदीदारांना घेता येणार आहे.