गुजरात : तीन आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने सुरू केली हालचाल, ६५ आमदारांना रिसॉर्टवर हलवले

राज्यसभा निवडणुकीअगोदर राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेस सोडणाऱ्या आमदारांवर हार्दिक पटेल यांची गंभीर टीका

हे छायाचित्र ४ जून रोजीचे आहे. जेव्हा काँग्रेसच्या दोन आमदारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाने बैठक बोलावली होती.(संग्रहीत प्रतिकात्मक)

गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीअगोदर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. १९ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीअगोदर काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सावधतेची भूमिका घेत आपल्या ६५ आमदारांना तीन रिसॉर्टमध्ये ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. या मागे काँग्रेसचे आणखी आमदार फुटू नये व राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ आणखी कमी होऊ नये अशी भूमिका असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसने तीन गटात आपल्या आमदारांची विभागणी केली असून, गुजरातमधील अंबाजी, राजकोट आणि वडोदरा या ठिकाणच्या रिसॉर्टवर त्यांना ठेवले असल्याची माहिती मिळाली आहे.

तर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय, २०१७ मधील पाटीदार आंदोलनातील त्यांचे जवळचे सहकारी आमदार बृजेश मेरजा यांनी दिलेल्या राजीनाम्यावर त्यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. “मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलीने मारायला हवे. मला विश्वास आहे की जनता या धोकेबाज आमदारांना पोटनिवडणुकीत चांगला धडा शिकवील, जसे की जनतेने या अगोदरही केलेले आहे.” असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

राज्यसभा निवडणूक मार्च महिन्यात होणार होती. मात्र करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसच्या आठ आमदारांनी राजीनामा दिलेला आहे. या आठवड्यात वडोदराच्या कर्जन येथून आमदार अक्षय पटेल, वलसाडच्या कप्रदाचे आमदार जीतू चौधरी आणि मोरबीचे आमदार बृजेश मेरजा यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा हादरा बसला आहे.

आमदारांच्या राजीनाम्यावर हार्दिक यांनी म्हटले आहे की, भाजपा राज्यसभा निवडणूकीत बहुमत मिळवण्यासाठी होईल त्या सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे. निवडणुकीअगोदर काँग्रेस आमदारांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला जात आहे. भाजपाकडे लोकसभेत संख्याबळ आहे. मात्र, राज्यसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत आपल्या जास्तीत जास्त नेत्यांना त्यांना विजयी करायचे आहे.

हार्दिक पटेल यांनी हे देखील सांगितले की, आता ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की, पक्ष बदल करणाऱ्या नेत्यांबद्दल भूमिका स्पष्ट करावी व अशा नेत्यांवर कारवाई करून एक उदाहरण निर्माण करावे. जेणेकरून जनतेचा लोकशाहीवरील विश्वसा कायम राहील. जे आमदार आपल्या मतदारांचा विश्वासघात करून पक्ष बदलतात, त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हायला हवी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gujarat after the resignation of three mlas the congress started a movement moving 65 mlas to the resort msr

ताज्या बातम्या