पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या तळावर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या जोरदार धुमश्चक्रीत पाचवा दहशतवादी ठार झाला आहे. दरम्यान, गेल्या दोन तासांपासून याठिकाणचा गोळीबार थांबला असून सुरक्षा दलाकडून उर्वरित दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह तिन्ही दलांचे प्रमुख आणि भारतीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांच्यातील उच्चस्तरीय बैठक नुकतीच संपली. दरम्यान, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे काही पुरावेही समोर आले आहेत.जम्मू- पठाणकोट महामार्गावरील भारतीय लष्कराच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी काल मध्यरात्री हल्ला चढवला. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाचे तीन जवानही शहीद झाले आहेत.
चार अतिरेक्यांना कंठस्नान घातल्यानंतर दरम्यानच्या काळात गोळीबार थांबला होता. मात्र, भारतीय लष्कराकडून शोध मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर पठाणकोठमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्रीला सुरूवात झाली होती. या दहशतवाद्यांच्या नेमक्या संख्येबद्दल माहिती नसल्यामुळे गोळीबार कुठून  होत आहे, याचा अंदाज घेऊन त्या परिसरात हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली होती. याशिवाय, सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांच्या नेमक्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी या परिसरात ड्रोन्स विमानेही तैनात करण्यात आली होती. भारतीय हवाईदलाचा पठाणकोटचा तळ पाकिस्तानी सीमेपासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी हवाई दलाची मिग-२१ विमाने आणि एमआय-२५ ही लढाऊ हेलिकॉप्टर्स ठेवण्यात येतात.
pathankot759a

राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या (एनएसए) ब्लॅक कॅट कमांडोचे पथक दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत आहेत. लष्कराच्या विशेष पथकाचे जवानदेखील या कारवाईत सहभागी आहेत. लष्कराची चार हेलिकॉप्टर्सदेखील या कारवाईत सहभागी झाली आहेत.

काल रात्रीच काही दहशतवाद्यांनी पंजाबमधील गुरूदासपूरचे अधीक्षक सलविंदर सिंग यांचे त्यांच्या गाडीसह अपहरण केले होते व थोड्याच वेळात हवाई दलाच्या तळावर हा हल्ला करण्यात आला. लष्कराच्या वेशात आलेल्या  दहशतवाद्यांनी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास हवाई दलाच्या तळावर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. हा हल्ला मध्यरात्री ३ च्या सुमारास करण्यात आला होता. तेव्हापासून या ठिकाणी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती.