Letter To Apple, Amazon And JP Morgan Why Do You Give Jobs To Foreigners: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे सिनेटर चक ग्रासली यांनी अॅमेझॉन, अॅपल आणि जेपी मॉर्गनसह दहा मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी या कंपन्यांना, “तुम्ही एच-१बी व्हिसा धारक परदेशी कर्मचाऱ्यांना का नोकऱ्या देत आहात?”, असा प्रश्न विचारला आहे.
याचबरोबर या अमेरिकन कंपन्यांमध्ये किती एच-१बी व्हिसा धारक परदेशी कर्मचारी आहेत, त्यांना किती वेतन दिले जाते आणि परदेशी लोकांना नोकऱ्या दिल्याने अमेरिकन कर्मचाऱ्यांना नोकरी मिळवण्याची संधी कमी झाली आहे का, असेही विचारले आहे.
अमेरिकन कर्मचारी बाजूला पडले
“सर्व स्थानिक अमेरिकन प्रतिभावान कर्मचारी बाजूला पडल्याने, आम्हाला विश्वास ठेवणे कठीण जात आहे की अॅमेझॉनला या पदांसाठी पात्र अमेरिकन कर्मचारी मिळत नाहीत”, असे सिनेटर चक ग्रासली यांनी अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ग्रासली यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा आढावा घेणार आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, अमेरिकेतील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित पदवीधरांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.
अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत
“तुम्हाला माहित आहे का, आता अमेरिकेतील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित पदवीधरांना बेरोजगारीचा जास्त सामना करावा लागतो? कदाचित मोठ्या टेक कंपन्या हजारो परदेशी कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्यासाठी अमेरिकन कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत”, असे चक ग्रासली म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसा शुल्क १ लाख डॉलर्सपर्यंत वाढवल्यानंतर चक ग्रासली यांनी हे पाऊल उचलले आहे. ग्रासली यांनी अलीकडेच होमलँड सिक्युरिटी विभागाला परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी देणे थांबवण्याची विनंती केली होती.
तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट हेरगिरीचा धोका
परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत काम करायला मिळत असल्याने अमेरिकेला तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट हेरगिरीचा धोका आहे, असे ग्रासली यांनी सूचित केले.
“होमलँड सिक्युरिटी विभागाने अमेरिकन लोकांशी स्पर्धा करणाऱ्या विद्यार्थी व्हिसा धारकांना कामाचे अधिकार देणे थांबवावे लागेल. हे कायद्याचे थेट उल्लंघन आहे. यामुळे अमेरिकेला तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट हेरगिरीचा धोका आहे,” असे ग्रासली यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.