Pakistan PM Shehbaz Sharif on Operation Sindoor: संयुक्त राष्ट्राच्या ८० व्या महासभेत बोलत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताबद्दल बेताल विधाने केली. तसेच भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबविण्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असेही म्हटले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ट्रम्प यांची स्तुती करत असताना भारताला लक्ष्य केले. मात्र त्यांच्या विधानानंतर भारताच्या राजदूत पेटल गहलोत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा बुरखा फाडला. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानने स्वतःचेच हसू करून घेतले.

काय म्हणाले शाहबाज शरीफ?

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलत असताना शाहबाज शरीफ म्हणाले, “जर ट्रम्प यांनी वेळेवर आणि निर्णायकपणे हस्तक्षेप केला नसता तर या संघर्षाचे विनाशकारी परिणाम झाले असते.” पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांना शांती पुरूष असे म्हटले. तसेच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील शस्त्रविराम हा ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळेच शक्य झाला, असेही ते म्हणाले.

विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत-पाक संघर्षात आपणच तोडगा काढला आहे, असे विधान केले आहे. आतापर्यंत त्यांनी ४० हून अधिकवेळा हा दावा केला असल्याचा आरोप काँग्रेसने यापूर्वी केला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याप्रमाणेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनीही संघर्ष थांबविण्याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना दिले होते. तसेच ट्रम्प हे नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र आहेत, असा प्रस्तावही ठेवला होता.

भारताची ७ विमाने पाडल्याचा बिनबुडाचा दावा

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ट्रम्प यांच्या स्तुतीसुमने उधळत असताना शाहबाज शरीफ यांनी भारताच्या हवाई दलाचे नुकसान केल्याचाही बिनबुडाचा दावा केला. ‘आमच्या हवाई दलाने भारताला जोरदार प्रत्युत्तर देत, भारताची ७ लढाऊ विमाने पाडली’, असा दावा शाहबाज शरीफ यांनी केला.

Young Indian Diplomat Who is Petal Gahlot
भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर उघड केला. (Photo – Petel Gehlot X Ac)

पाकिस्तानने यापूर्वीही भारताची लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला असला तरी याबाबत कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत. भारताने पाकिस्तानचे दावे निराधार असल्याचे सांगत त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत असा दावा केला की, मे महिन्यात भारताशी झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने भारताची ७ विमाने पाडली. शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, “या वर्षी मे महिन्यात माझ्या देशाला पूर्वेकडून विनाकारण आक्रमणाचा सामना करावा लागला. याला आमचा प्रतिसाद स्वसंरक्षणाच्या अनुषंगाने होता. आम्ही त्यांना अपमानास्पदरीत्या माघारी पाठवले.”

शाहबाज शरीफ यांच्या बिनबुडाच्या दाव्याला भारताने शनिवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी शाहबाज शरीफ यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. पेटल गहलोत यांनी शरीफ यांच्या भाषणाला हास्यास्पद नाटक म्हणत पाकिस्तान दहशतवादाचे उदात्तीकरण करत असल्याचा आरोप केला. तसेच पाकिस्तान वारंवार दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सत्य जगासमोर आलेले आहे, असेही पेटल गहलोत यांनी म्हटले.