हलाला या प्रथेचा इस्लामशी काहीही संबंध नाही असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे. हलाला या प्रथेला इस्लामशी जोडण्यात आले असून प्रत्यक्षात हलालाचा इस्लामशी काहीही संबंध नाही असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे. हलाला या प्रकारामध्ये पत्नीला घटस्फोट दिला असेल व त्या दोघांना पुन्हा विवाह करायचा असेल तर त्याआधी त्या महिलेला दुसऱ्या पुरूषाशी विवाह करायला लागतो, त्याच्याबरोबर पत्नी म्हणून रहावं लागतं, त्याच्याशी घटस्फोट घ्यायला लागतो आणि नंतरच ती पुन्हा पहिल्या पतीशी विवाह करू शकते.

हलाला प्रथेच्या कायदेशीर वैधतेवर सर्वोच्च न्यायालय लवकरच निर्णय देणार आहे. निकाह हलाला प्रथे विरोधात चार याचिका दाखल झाल्या असून न्यायालयाचे घटनापीठ त्यावर सुनावणी करणार आहे. मागच्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं तीन विरुद्ध दोन अशा बहुमतानं तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवले होते.

केंद्र सरकारनेही तिहेरी तलाकच्या प्रथेविरोधात कायदा केला आहे. लोकसभेत या संबंधीचे विधेयक मंजूर झाले आहे. राज्यसभेत अद्यापही हे विधेयक प्रलंबित आहे. या कायद्यातंर्गत तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.