Harsha Bhogle Appeals Stop Feeding Pigeons : मुंबईत सध्या कबुतरांचा विषय तापला आहे. कबुतरांमुळे पसरणारी रोगराई, कबुतरखान्यांच्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये उद्भवत असलेल्या आरोग्याच्या समस्यांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, जैन समुदाय व काही पक्षीप्रेमी निर्णयाविरोधात आक्रमक झाले. त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनं केली. अनेक आंदोलकांनी न्यायालयाचे आदेश बजावणाऱ्या महापालिका कर्मचारऱ्यांविरोधात व पोलिसांविरोधात कायदा हातात घेतला. काही जैन सांधूंनी व संघटनांनी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारला उत्तर देऊ असं म्हटलं आहे.

मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समुदायाने दादर येेथील योगी सभागृहात प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. या धर्मसभेत जैन मुनींनी राजकीय पक्षाची स्थापना केल्याची घोषणा केली. कबुतर आणि इतर प्राण्यांच्या संरक्षणासाठी ‘शांतीदूत जनकल्याण पक्ष’ स्थापन करत असल्याचं जैन मुनींनी जाहीर केलं आहे. अशातच क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भोगले यांनी मुंबईप्रमाणे दिल्लीतही कबुतरांची मोठी समस्या असल्याचं सांगत याकडे सर्वांच लक्ष वेधलं.

हर्षा भोगले यांनी दी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. ही बातमी शेअर करत भोगले म्हणाले की “डॉक्टर कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधत असताना काही जण मोकळ्या जागी कबुतरांना दाणे टाकत असतात. दिल्लीतल्या एका मैदानात कबुतरांना दाणे टाकणाऱ्या लोकांना पाहून मला खूप वाईट वाटलं.”

आपण कबुतरांना दाणे टाकणं बंद करुया : हर्षा भोगले

भोगले यांनी पुण्यातील एका घटनेची माहिती एक्सवर शेअर केली आहे. पुण्यातील माजी नगरसेवक शाम मानकर यांच्या मुलीचा कबुतरामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्यू झाला. त्यानंतर ते याबाबत जनजागृती करत आहेत. यासंबंधीची बातमी एक्सवर शेअर करत हर्षा भोगले म्हणाले, “दिल्लीतील एका मैदानात जाताना मी पाहिलं की काही लोक कबूतरांच्या एका भल्या मोठ्या थव्याला दाणे टाकत होते. हे दृश्य पाहून माझं मन हेलावून गेलं. कारण एका बाजूला डॉक्टर बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून आपल्याला सांगत आहेत की कबुतरांच्या विष्ठेमुळे किती गंभीर आजार होऊ शकतात, त्यांच्या विष्ठेमुळे फुप्फुसांचे आजार होऊ शकतात. त्यामुळे कृपया आपण कबुतरांना दाणे टाकणं बंद करुया.”