आंतरधर्मीय जोडप्यासह नऊ जणांवर 'हरियाणा धर्मांतरविरोधी कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल | haryana anti conversion law 9 booked with interfaith couple rmm 97 | Loksatta

आंतरधर्मीय जोडप्यासह नऊ जणांवर ‘हरियाणा धर्मांतरविरोधी कायद्या’अंतर्गत गुन्हा दाखल

फरिदाबाद पोलिसांनी शुक्रवारी हरियाणाच्या धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत एका आंतरधर्मीय जोडप्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

crime news
प्रातिनिधिक फोटो-इंडियन एक्स्प्रेस

फरिदाबाद पोलिसांनी शुक्रवारी हरियाणाच्या धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत एका आंतरधर्मीय जोडप्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मार्चमध्ये, हरियाणा विधानसभेने ‘हरियाणा बेकायदेशीर धर्मांतरण प्रतिबंधक विधेयक, २०२२’ मंजूर केले होते. हा कायदा पारित केल्यानंतर पहिल्यांदाच या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कायदा मंजूर करताना सरकारने म्हटलं की, “एखाद्या व्यक्तीचं सक्तीने, दबाव टाकून किंवा प्रलोभने देऊन होणारं धर्मांतरण रोखणे, हे या कायद्याचं उद्दिष्ट आहे. गुरुवारी मंत्रिमंडळाने हा कायदा लागू करण्यास मंजुरी दिली.

संबंधित प्रकरणात, एका २२ वर्षीय हिंदू तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या मुलीने नुकतेच दुसर्‍या धर्मातील एका तरुणाशी लग्न केलं. तरुणाच्या कुटुंबाने जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे आपल्या मुलीचं धर्मांतर केल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला.

पोलीस तक्रारीत तरुणीच्या वडिलांनी आरोप केला की, “मी हिंदू धर्माचा अनुयायी आहे. माझ्या मुलीला एका मुस्लीम व्यक्तीने आमिष दाखवून लग्न केलं. एका वर्षापूर्वी आरोपी तरुण, त्याचा भाऊ आणि त्याचे आई-वडील माझ्या मुलीसाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन घरी आले होते. मी त्यांना लग्नासाठी नकार दिला. आम्ही हिंदू आहोत आणि तिला मुस्लिमांशी लग्न करू देणार नाही, असं मी त्यांना सांगितलं. पण तुमच्या परवानगीची आम्हाला गरज नाही, असे सांगून ते निघून गेले.”

हेही वाचा- मुंबई: १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

“२८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता, मी तिला ती काम करत असलेल्या बँकेजवळ सोडलं. परंतु अर्ध्या तासानंतर मला तिच्या कार्यालयातून फोन आला की ती कामावर आली नाही. तिचा फोनही बंद होता. त्याच दिवशी संध्याकाळी, मला कळले की तिने धर्मांतर करत मुस्लीम तरुणाशी लग्न केलं. त्यांनी पोलीस संरक्षणासाठी अर्जही केला आणि त्याबाबत मला जिल्हा न्यायालयाकडून नोटीसही मिळाली होती” असं तरुणीच्या वडिलांनी ८ नोव्हेंबर रोजी पोलीस तक्रारीत सांगितलं.

हेही वाचा- UP CRIME: रक्तबंबाळ अवस्थेत अल्पवयीन पीडितेची मदतीची याचना, व्हायरल व्हिडीओत बघ्यांचं संतापजनक कृत्य

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना वडिलांनी आरोप केला, “माझ्या मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले आहे. हरियाणा बेकायदेशीर धर्मांतरण प्रतिबंधक कायदा-२०२२ मधील तरतुदींनुसार, माझ्या मुलीचं धर्मांतर आणि विवाह अवैध आहे. त्यामुळे सर्व आरोपींना अटक करून कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी. माझी मुलगी कुठे आहे, हे मला माहीत नाही. तीही यामध्ये दोषी आढळली तर तिच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी. कारण यातून समाजात एक संदेश जाईल आणि इतर हिंदू मुलींचं बेकायदेशीरपणे धर्मांतर होणार नाही.”

हेही वाचा- Uttar Pradesh Crime: आजमगड हादरलं! लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे विहिरीत फेकले अन्…

याबाबत अधिक माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, “याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. सर्व आरोपी फरार आहेत. लग्नानंतर या जोडप्यानं पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांना तीन दिवस पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. संबंधित कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीला धर्म बदलायचा असल्यास त्याने एसडीएम कार्यालयात अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. यानंतर यावर आक्षेप घेण्यासाठी आणि कुटुंबांना सूचित करण्यासाठी नोटीस कालावधी दिला जातो. पण या प्रकरणात योग्य प्रक्रिया पाळली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 17:48 IST
Next Story
गँगस्टरची हत्या, राजकीय प्रतिक्रिया आणि जातीय समीकरण, राजस्थानमध्ये काय घडतंय?