IPS Puran Kumar Suicide Case Wife Amneet P Kumar lodge complaint : हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणी आता कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे. चंदीगड पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणी हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर यांच्यासह १३ पोलीस अधिकाऱ्यांवर व निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूरन कुमार यांनी सुसाइड नोटमध्ये ज्या-ज्या अधिकाऱ्यांची नावं नमूद केली होती त्यांच्यावर आता कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे.

पूरन कुमार हे २००१ च्या बॅचचे हरियाणा केडरचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी नऊ पानांची सुसाइड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये १३ अधिकाऱ्यांची नावं नमूद करण्यात आली होती. यात हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत सिंह कपूर आणि रोहतकचे पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारनिया यांची देखील नावं आहेत.

वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल?

पूरन कुमार यांनी त्यांच्या सुसाइड नोटमधून आरोप केला आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा मानसिक छळ केला होता. तसेच जातीवरून भेदभाव केला जात होता. या भेदभावामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते असं त्यांनी त्यांच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं केलं आहे. या छळामुळेच त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचं देखील नमूद केलं आहे.

आयपीएस पूरन कुमार यांनी त्यांच्या सुसाइड नोटमधून आरोप केला आहे की हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्याबरोबर जातीय भेदभाव करत होते, तसेच कार्यालयात त्यांचा मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या कोलमडले होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

IAS पत्नीच्या तक्रारीनंतर सूत्रं हलली

पूरन कुमार यांच्या आरोपांच्या आधारावर त्यांच्या पत्नी व वरिष्ठ आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार यांनी बुधवारी चंदीगडच्या सेक्टर ११ येथील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. अमनीत यांनी त्यांच्या तक्रारीत हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत सिंह कपूर व रोहतकच्या पोलीस अधीक्षकांचं नाव नमूद केलं आहे. या दोघांसह हरियाणा पोलीस दलातील इतर काही अधिकाऱ्यांनी पूरन कुमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप अमनीत कुमार यांनी केला आहे.