Haryana Mass Suicide reason: हरियाणाच्या पंचकुला येथे एक धक्कादायक घटना घडली. एका वाहनात सात जणांचे मृतदेह आढळून आले. हे सातही जण एकाच कुटुंबातले असून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. ४४ वर्षीय प्रवीण मित्तल हे कुटुंबप्रमुख असून त्यांनी लिहिलेली दोन पानांची सुसाईड नोट गाडीत आढळून आली आहे. यात त्यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मृत प्रवीण मित्तल यांच्या नातेवाईकाने दावा केला की, मित्तल यांच्यावर २० कोटींचे कर्ज होते. याप्रकरणी त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. या तणावाखाली आल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा.

रविवारी पंचकुला येथे एका गाडीत प्रवीण मित्तल आणि त्यांच्या कुटुंबातील सहा जणांचा मृतदेह आढळून आला होता. स्वत: ४४ वर्षीय प्रवीण मित्तल, त्यांची पत्नी रीना, आई विमला, वडील देशराज, त्यांच्या ११ वर्षीय जुळ्या मुली ध्रुविका आणि दलिशा तर १४ वर्षांचा मुलगा हार्दिक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका स्थानिक रहिवाशाने गाडीत संशयास्पद हालचाल पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

मित्तल कुटुंबिय मुळचे हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बरवाला येथील राहणारे होते. १२ वर्षांपूर्वी ते पंचकुला येथे स्थायिक झाले. मित्तल यांचा हिमाचल प्रदेशमध्ये भंगारचा कारखाना होता. पण बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे बँकेने त्यावर जप्ती आणली, अशी माहिती प्रवीणचा मामेभाऊ संदीप अग्रवाल यांनी दिली.

कर्जाची रक्कम वाढल्यामुळे मित्तल कुटुंबिय हरियाणा सोडून देहरादून येथे राहायला गेले होते. पाच वर्षांपासून मित्तल कुटुंबिय कुणाच्याही संपर्कात नव्हते. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, त्यामुळेच त्यांनी हिसार सोडण्याचा निर्णय घेतला होता, असेही संदीप अग्रवाल यांनी सांगितले.

उत्तराखंडमधून परतल्यानंतर प्रवीण मित्तल पंचकुला येथील साकेत्री गावात राहत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी तो टॅक्सी चालविण्याचे काम करत होता. कर्जाची परतफेड केली नाही म्हणून बँकेने प्रवीण मित्तलचे दोन फ्लॅटवर जप्ती आणली होती. तसेच त्याचा कारखाना आणि वाहने आधीच जप्त केले होते, असेही संदीप अग्रवाल यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संदीप अग्रवाल पुढे म्हणाले की, पाच दिवसांपूर्वीच मी प्रवीणबरोबर बोललो होतो. तसेच त्याच्यावर मी अंत्यसंस्कार करावेत, असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.