चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केल्याच्या प्रकरणावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्र सोडले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी राजस्थानमधील चित्तोडगड येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना भारत-चीन वादावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी हे ‘खोटारड्यांचे सरदार’ आहेत, अशी उपमाही त्यांनी दिली. चीन भारतीय भूमीवर कब्जा करत असताना पंतप्रधान मोदी हातावर हात ठेवून बसले आहेत. सीमेवर उदासीनता दाखविणारे मोदी आपल्या भाषणात मात्र गांधी कुटुंबावर टीका करतात. पण याच कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहे, हे ते विसरतात, अशी टीका खरगे यांनी केली.

मोदींनी झोपेच्या गोळ्या घेतल्या का?

चीन भारतीय प्रदेशात घुसखोरी करत असताना पंतप्रधान मोदी यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत का? असाही सवाल खरगे यांनी उपस्थित केला. खरगे पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदींची छाती ५६ इंचाची आहे आणि ते कुणालाही घाबरत नाहीत, तर मग भारताच्या भूमीचा एका मोठा भाग त्यांनी चीनला गिळंकृत का करू दिला.”

ही तर पंतप्रधान मोदींची ‘चिनी गॅरंटी’: काँग्रेस

ते आपल्या देशात घुसखोरी करत आहेत आणि तुम्ही झोपेत आहात का? तुम्ही झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत का? किंवा राजस्थानच्या शेतामधील अफू तुम्ही घेऊन गेला आणि ती खाल्ली का? असाही प्रश्न खरगे यांनी विचारला.

याशिवाय केंद्रीय यंत्रणाच्या गैरवापरावरूनही खरगे यांनी मोदींवर टीका केली. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांचा वापर करून नामोहरण करणारे केंद्र सरकार हेच भ्रष्ट नेते जेव्हा भाजपामध्ये येतात, तेव्हा त्यांना अभय देते, असाही आरोप त्यांनी केला. खरगे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ही मोठी वॉशिंग मशीन आहे.

भाजपामध्ये खोटारड्या लोकांची मोठी फौज आहे आणि पंतप्रधान मोदी या खोटारड्यांचे सरदार आहेत, असेही खरगे म्हणाले. खरगेंनी आपल्या भाषणात २५ राजकीय नेत्यांचा उल्लेख केला, ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते. मात्र त्यापैकी दोघांनी भाजपामध्ये प्रवेश करताच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले गेले. उर्वरित २३ जणांनाही असेच क्लीन केले जाईल.

गांधी कुटुंबियांच्या बलिदानाबाबत बोलताना खरगे म्हणाले, पंतप्रधान मोदी नेहमीच गांधी परिवाराला लक्ष्य करतात. सोनिया गांधी यांनी पती गमावला. जेव्हा काँग्रेसला बहुमत मिळाले, तेव्हा काँग्रेस नेत्यांनी त्यांना पंतप्रधानपद स्वीकारण्यास सांगितले. पण सोनिया गांधी यांनी अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांच्या हातात सरकारची कमान दिली.