Crime News : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या हेड कॉन्स्टेबलनेच ५० लाख रुपये आणि दोन पेट्या भरून सोनं चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर या पोलीस कर्मचार्याला रविवारी अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील लोधी गार्डनर भागातील एका हाय-सेक्युरिटी इमारतीतून त्याने ही चोरी केली होती.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ४ वाजता खुर्शीद हा लोधी गार्डन भागात असलेल्या स्पेशल सेलच्या मालखाना म्हणजेच स्टोरेज रुमच्या परिसरात दाखल झाला. त्यानंतर तो आतमध्ये चार सुरक्षेचे स्तर असलेल्या ठिकाणापर्यंत गेला आणि दोन सोन्याच्या पेट्या आणि बॅग भरून रोकड घेऊन साडेचार वाजण्याच्या सुमारास बाहेर आला, असे पोलिसांनी सांगितले.
नेमकं काय झालं?
खुर्शीद हे गेल्या महिन्यापर्यंत मालखाना येथे सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करत होता, त्याची नुकतीच पूर्व दिल्ली जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ दिल्ली पोलीस स्पेशल सेल अधिकाऱ्यांनी सांगितले की त्याला मालखान्याच्या प्रत्येक गोष्टीची त्याला माहिती होती आणि तिथे तैनात असलेल्या सर्व सुरक्षा कर्मचारीही त्याला ओळखत होते. “सुरक्षा कर्मचार्यांना त्याची बदली झाल्याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे तो कोणीही दखल न घेता आतमध्ये जाऊ शकला,” असेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यान सांगितले.
मालखान्यातून महत्त्वाचे पुरावे गायब झाल्याचे आढळून आल्यानंतर रविवारी रात्री उशिरा पूर्व दिल्लीतून खुर्शीद याला अटक करण्यात आली. “तपासात अशी माहिती समोर आली की, सुरक्षा कर्मचार्यांना तो अजूनही तेथे तैनात आहे असे वाटल्याने खुर्शीदने परिसरात प्रवेश केला. त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आणि ऐवज घेऊन बाहेर पडला. केस प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे आणि खुर्शीदची चौकशी सुरू आहे,” असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) यांनी सांगितले.
सुरक्षेचा चोख बंदोबस्त
स्पेशल सेलचा लोधी कॉलनी मालखान्याला चार स्तरांची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. ज्यामधे पहिल्या स्तरात नागालँड पोलीस दलाचे जवान लोधी कॉलनी परिसरावर लक्ष ठेवतात. दुसर्या स्तराची सुरक्षा ही ड्युटी ऑफिसरची असते, त्यांच्याकडून या कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची माहिती तपासली जाते. तिसर्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था ही लाईट मशिन गन (एमएमजी)घेतलेल्या सुरक्षा रक्षकांकडून सांभाळली जाते. तर चौथ्या स्तरामध्ये आणखी एक ड्युटी ऑफिसर हा पुन्हा एकदा हाय-सेक्युरिटी भागात प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करतो.