मार्गदर्शक तत्त्वे जारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : विमानतळ, रेल्वे स्थानक व बस स्थानकावर प्रवाशांची निर्गमन कक्षात आल्यानंतर तापाची तपासणी करण्यात यावी त्याशिवाय त्यांना सोडू नये, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे. ज्या लोकांमध्ये लक्षणे नाहीत अशांना १४ दिवस स्वविलगीकरणात राहण्यास सांगण्यात यावे.

प्रवाशांना तिकिटे देताना त्यावरच नियमावली सादर करण्यात यावी. देशांतर्गत प्रवासाचे नियम सर्व प्रवाशांना समजावेत अशी व्यवस्था करण्यात यावी. आता सक्ती नसली तरी प्रवाशांना आरोग्य सेतू उपयोजन डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने १ जून पासून सेवा सुरू करण्याचे ठरवले असून पहिल्या शंभर गाडय़ांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात दुरांतो, संपर्क क्रांती, जन शताब्दी व पूर्व एक्स्प्रेस यांचा समावेश आहे.

दोन महिन्याच्या बंदीनंतर हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही देशांतर्गत विमानसेवा २५ मेपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले. विमानतळांवर प्रवाशांची तपासणी होणार असून लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच बसू दिले जाणार आहे. मास्क, हाताचे व श्वासाचे आरोग्य सांभाळण्यास सांगण्यात आले आहे. विमानतळे, रेल्वे स्थानके, बसस्थानके येथे सामाजिक अंतराचा नियम लागू राहणार आहे. या सर्व ठिकाणी साबण, सॅनिटायझर उपलब्ध करण्यात येणार आहेत. जे लोक ताप तपासणीत लक्षणे असलेले सापडतील त्यांची व्यवस्था जवळच्या आरोग्य केंद्रात केली जाणार आहे. ज्यांना गंभीर लक्षणे असतील त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येईल. सौम्य लक्षणे असलेल्यांना घरातच विलगीकरणास सवलत दिली जाईल किंवा कोविड केंद्रातही दाखल केले जाऊ शकते. ज्यांना कुणाला नंतर लक्षणे दिसतील त्यांनी १०७५ क्रमांकावर संपर्क साधून कळवणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health ministry issues guidelines for domestic and international travel zws
First published on: 25-05-2020 at 01:34 IST