नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदान व इतर वादग्रस्त मुद्द्यांसंदर्भात ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. काँग्रेसची ही मागणी आयोगाने मान्य केली असून तसे पत्र शनिवारी काँग्रेसला पाठवण्यात आले.

काही मतदारसंघांमध्ये मतदारांची नावे गायब झाली असून काहींमध्ये मतदारांमध्ये वाढ झाली आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये अनियमितता असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ ते रात्री साडेअकरा या दरम्यान मतांच्या टक्केवारीत अनपेक्षित वाढ झाली असून हे वाढीव मतदान शंकास्पद असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता. या दोन मुद्द्यांवर आयोगाने सुनावणी घ्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चन्निथाला व महासचिव मुकुल वासनिक यांनी पत्राद्वारे केली होती. यासंदर्भात तीनही नेत्यांनी आयोगाची शुक्रवारी भेटही घेतली होती.

हेही वाचा >>>‘हिंदूंवरील अत्याचार त्वरित रोखा’; आध्यात्मिक नेत्याची सुटका करण्याचे संघाचे बांगलादेशला आवाहन

मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व राजकीय पक्षांना सहभागी करून घेतले जाते. मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातात व त्याची प्रत पक्षांना दिली जाते व त्यांना पडताळणी करण्यासही सांगितले जाते. ही प्रक्रिया पारदर्शक असते तरीही काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची आयोगाने दखल घेतली आहे. त्यासंदर्भातील मुद्द्यांची सुनावणीवेळी दखल घेतली जाईल, असे आयोगाने काँग्रेसला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>अदानीप्रकरणी राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदान आकडेवारीबाबत स्पष्टीकरण

मतदान पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी ‘अर्ज १७-क भाग-१’च्या माध्यमातून उमेदवारांना दिली जाते. अर्ज १७ मधील आकडेवारीमध्ये कोणताही बदल केला जात नाही. मतदानाची अंतिम आकडेवारी रात्री ११.४५ वाजता व्होटर अपवर प्रसिद्ध केली जाते. संध्याकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणारी मतांची टक्केवारी व रात्री पावणेबारा वाजता दिल्या जाणारा मतांचा अंतिम टक्का यांच्यातील तफावतीसंदर्भात आयोगाने अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे, असे आयोगाने म्हटले आहे.