बाबा केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. केदारनाथ धाम येथे पोहोचण्यासाठी यात्रेकरू पायी मार्गाचा किंवा इतर पर्यायांचा स्वीकार करतात. तर काही भाविक हॅलिकॉप्टरने केदारनाथ धाम येथे पोहोचतात. शुक्रवारी यात्रेकरून नेण्यासाठी उड्डाण घेतलेल्या एका हॅलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हॅलिकॉप्टरचे हॅलीपॅडवर सुरक्षित लँडिंग होऊ शकले नाही. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. खेळण्या प्रमाणे हे हॅलिकॉप्टर जमिनीच्या दिशेने गरा-गरा फिरत खाली येताना दिसत आहे. काही क्षणात हॅलिकॉप्टर जमिनीवर आदळते. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आणि सहा प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रुद्रप्रयागच्या सिरसी येथून सकाळी केदारनाथ धामसाठी हॅलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते. सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी केदारनाथ येथे पोहोचल्यानंतर जमिनीपासून १०० मीटर अंतरावर असताना हॅलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यानंतर पायलटने परिस्थिती नियंत्रणात आणत हॅलिपॅडपासून बाजूला असलेल्या मातीत लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. मातीरवर लँड केल्यामुळे हॅलिकॉप्टरला फार नुकसान झाले नाही. त्यामुळे पायलटसह सहा प्रवाशांचा जीव वाचू शकला.

या घटनेचा व्हिडीओ आज दिवसभर सोशल मीडियाव चांगलाच व्हायरल होत आहे. हॅलिकॉप्टर ज्या पद्धतीने खाली येत होते, ते पाहून सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकला होता. मात्र काही क्षणात सर्वकाही ठिक असल्याचे कळात सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

चारधाम यात्रा सुरू झाल्यापासून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काही दिवसांतच केदारनाथ धामचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या तीन लाखांच्याही पुढे गेली आहे. सोमवारी ३७ हजारांहून अधिक भाविकांनी केदारनाथ बाबाच्या मंदिराचे दर्शन घेतले होते. तर रोज सरासरी २५ हजार भाविक याठिकाणी येत आहेत.

व्हीआयपी दर्शन बंद

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिरातील गाभाऱ्यातील दर्शन बंद करण्यात आले होते. मात्र पुजाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा गाभारा उघडला गेला. भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद केले असून सर्वच भाविक आता गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊ शकतात.