पीटीआय, वॉशिंग्टन
रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल दंड म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादले. आधी जाहीर केलेले २५ टक्के शुल्क लागू होण्यास १४ तास बाकी असताना, ट्रम्प यांनी हा नवा आदेश काढला असला, तरी या अतिरिक्त कराची अंमलबजावणी आदेश निघाल्यापासून २१ दिवसांनी केली जाईल.
भारत रशियाकडून तेल खरेदी करून एका अर्थी युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाला मदत करतो, असा आरोप करत २४ तासांत भारतावर भरमसाठ आयातशुल्क लादण्याची धमकी ट्रम्प यांनी मंगळवारी दिली होती. ही धमकी खरी करून दाखवत त्यांनी बुधवारी अतिरिक्त कराच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानुसार सवलत दिलेल्या काही वस्तू व सेवा वगळता भारतीय मालावर ५० टक्के शुल्क लादले जाईल. आधी जाहीर केलेल्या २५ टक्के शुल्काची अंमलबजावणी आज, गुरुवारपासून होणार आहे. तर बुधवारपासून २१ दिवसांनी अतिरिक्त २५ टक्के शुल्काचा आदेश देत अमेरिकेला हवा असलेला व्यापार करार करण्यासाठी दबाव वाढविल्याचे मानले जात आहे. अतिरिक्त शुल्क लागू होण्यापूर्वी भारतातून अमेरिकेकडे निघालेल्या आणि १७ सप्टेंबरला रात्री १२.०१ वाजेपर्यंत विक्रीसाठी गोदामाबाहेर काढण्यात आलेल्या मालावर हे अतिरिक्त शुल्क लागू नसेल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
…तर ब्राझीलशी बरोबरी
ट्रम्प यांच्या आदेशानुसार भारतीय मालावर ५० टक्के शुल्क लादले गेले, तर ते जगात सर्वाधिक असेल. अमेरिकेने सध्या केवळ ब्राझीलवर ५० टक्के आयातकर लावला आहे. ‘ब्रिक्स’मधील अन्य देश चीन आणि दक्षिण आफ्रिकेवरदेखील ३० टक्के शुल्क असले, तरी भारतावरील कर त्यापेक्षा कितीतरी जास्त होईल. विशेष म्हणजे निर्यातीमध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या आशियातील बांगलादेश, व्हिएतनाम यांच्या तुलनेत भारताला मोठी झळ सोसावी लागेल.
जिनपिंग यांच्याशी व्यापारयुद्धाबाबत चर्चा?
ऑगस्ट महिनाअखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यावेळी ते चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना भेटण्याचा अंदाज आहे. यावेळी उभय नेत्यांमध्ये ‘ट्रम्प टेरिफ’ आणि त्यामुळे बदलत असलेल्या भूराजकीय संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.