पश्चिम अफ्रिकेतील घाना देशात मारबर्ग या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घानातील दक्षिण अशांती भागात या विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे या विषाणूचा संसर्ग वेग आणि मृत्यूदर अधिक असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) सतर्कतेचा इशारा दिला आहे. मारबर्ग विषाणूच्या संसर्गामध्ये मृत्यूदर तब्बल ८८ टक्के आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास रुग्णाला तीव्र ताप हे लक्षण दिसते.

मारबर्ग विषाणू संसर्ग झालेल्या प्राण्यामधूनही पसरतो. यात वटवाघळाचाही समावेश आहे. हा विषाणू ज्याला संसर्ग झाला त्याच्यावर वेगाने परिणाम करतो. यामुळे बाधित व्यक्तिला तीव्र ताप, अंतर्गत व बाह्य रक्तस्राव आणि गंभीर डोकेदुखीचा त्रास जाणवतो.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, घानातील बाधित व्यक्ती खाण आणि गुहांमध्ये दीर्घकाळ काम करत होते. त्यातून त्यांना वटवाघळाच्या माध्यमातून या मारबर्ग विषाणूचा संसर्ग झाला. यातील धोका म्हणजे एकदा की मारबर्ग विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केला की त्याचा इतर मानवी शरीरांमध्ये वेगाने संसर्ग होतो. यात रक्त, जखमा, शरीराचे इतर द्रव्ये यांच्या माध्यमातून हा विषाणू बाधा करतो. एकमेकांचे कपडे वापरण्यातूनही या विषाणूची बाधा होऊ शकते.

हेही वाचा : पालघरमध्ये झिकाचा रुग्ण, आश्रम शाळेतील सात वर्षीय मुलीला बाधा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारबर्ग विषाणू इबोला विषाणू इतकाच जीवघेणा आहे आणि त्यावर अद्याप कोणतेही औषधोपचार किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळेच WHO कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.