नवीन वर्षांत चांगले काय वाचायला मिळेल, या प्रतीक्षेत असणाऱ्या दर्दी वाचकांची निराशा होणार नाही हे नक्की. कारण या वर्षांत वाचकांना प्रणव मुखर्जी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग यांच्या आत्मचरित्रांसह हिलरी क्लिंटन यांच्या जीवनाचा आढावा घेणारे पुस्तक, प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर आदींसह संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या आरुषि हत्याकांडाशी निगडित पुस्तकही वाचकांच्या हाती पडणार आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्याचा पट उलगडून दाखवणारे द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग अ‍ॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग हे पुस्तक त्याचे जवळचे सहकारी संजया बारू यांनी लिहिले आहे. हे पुस्तक मार्चमध्ये वाचकांच्या हाती पडणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे पुस्तक जयंता घोसाळ यांनी लिहिले आहे. तर अमेरिकेचे परराष्ट्रधोरण तसेच २१ व्या शतकातील बदलते राजकारण आणि आव्हाने यांचा पट उलगडून दाखविणारे हिलरी क्लिंटन यांच्या कार्याचा आढावा घेणारे सायमन आणि शुश्टर यांनी लिहिलेले पुस्तकही वाचकांना माहितीचा नवा खजाना उलगडून दाखवील, अशी आशा आहे. या पुस्तकात अमेरिकेची वजनदार मंत्री म्हणून हिलरी क्लिंटन यांनी घेतलेले निर्णय आणि त्याचा अमेरिकेवर तसेच जगावर झालेला परिणाम यांचा आढावाही या पुस्तकात घेतला आहे.
याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आढावा घेणारी अनेक पुस्तके बाजारात दाखल होणार आहेत. यापैकी मनोज मिट्टा यांनी लिहिलेले ‘मोदी अ‍ॅण्ड गोध्रा : द फिक्शन ऑफ फॅक्ट फाइंडिंग’ तसेच रमेश मेनन यांचे नरेंद्र मोदी ही पुस्तके नव्या वर्षांत वाचकांना अधिक आकर्षित करतील,असा विश्वास प्रकाशकांना आहे. मोदींव्यतिरिक्त संकरशन ठाकूर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजकीय पट उघडून दाखविणारे सिंगल मॅन- नितीश कुमार ऑफ बिहार हे पुस्तकही वाचकांसमोर अनेक राजकीय घटनांवर प्रकाश टाकेल.
दिल्लीत १४ वर्षीय आरुषीची झालेल्या हत्येने देशभरात एकच खळबळ उडवून दिली. पत्रकार अविरुक सेन यांनी आरुषी हत्याकांडाचा वेध घेणारे पुस्तक लिहिले आहे. आरुषी हत्याकांडाचा खटल्याचा मागोवा घेणाऱ्या सेन यांनी तपास अधिकारी, वकील, आरुषीचे मित्र मैत्रीण, कुटुंबीयांशी चर्चा करून या हत्याकांडाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. हाच प्रवास सेन यांनी आरुषी हत्याकांडाबाबतच्या पुस्तकात मांडला आहे.  
याशिवाय क्रीडा प्रकारात टेनिस स्टार सानिया मिर्जा आमि महेश भूपती यांच्या हार्पर कॉलिन्स यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रांसह पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासाचा आढावा घेणारे ‘वुंडेड टायगर’ हे पीटर ऑब्रॉन यांचे पुस्तक खेळवेडय़ा वाचकांच्या दिमतीला हजर असणार आहे. याशिवाय आरोग्य आणि व्यायाम, मनोरंजन, खाद्यपदार्थ आदी विषयांना वाहिलेली पुस्तकेही वाचकांच्या दिमतीला असणार आहेत. त्यामुळे २०१४ मध्ये वाचकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाचनाचा आनंद घेता येणार असून येणारी नवीन पुस्तके त्यांच्या पसंतीस उतरतील,असा विश्वास प्रकाशकांनी व्यक्त केला आहे.