काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी भाजपला आणि संघाला खोचक टोला लगावला. भाजपा आणि संघ यांना गुरू मानतो असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यावर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी पलटवार केला आहे. त्यांनी राहुल गांधी यांना थेट आव्हानच दिलं आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?
भाजपाने माझ्यावर आक्रमकपणे टीका करावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या या टीकेमुळे काँग्रेस पक्षाला आपली विचारधारा समजण्यास मदत होईल. माझ्यावर जेवढी टीका होईल, तेवढा काँग्रेस पक्षाला फायदा होईल. त्यामुळे एकप्रकारे मी भाजपाला माझा गुरू मानत असून त्यांच्यामुळेच मला आयुष्यात काय करू नये, याची शिकवण मिळते”, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.

भारत जोडो यात्रेबाबत बोलताना ते म्हणाले, “ही यात्रा जेव्हा आम्ही सुरू केली. तेव्हा ती साधारण यात्रा होती. मात्र, त्यानंतर हळू-हळू या यात्रेत लोकं जोडली गेली.आज ही यात्रा सर्वसामान्यांचा आवाज बनली आहे. देशातील विरोधीपक्षदेखील आमच्या बरोबर आहेत. मला कल्पना आहे की राजकीय मतभेदांमुळे काही लोकं या यात्रेत सहभागी होत नाहीत. मात्र, आमची विचारधारा एक आहे”, असेही ते म्हणाले.

हिमंता बिस्वा शर्मा यांनी काय पलटवार केला आहे?
राहुल गांधी यांनी जर भाजपा आणि आरएसएसला गुरूतुल्य मानलं असेल तर त्यांनी नागपूरला संघ मुख्यालयात जावं आणि तिथे संघाच्या झेंड्यासमोर नतमस्तक व्हावं. हिमंता बिस्वा शर्मा यांनी कमलनाथ यांच्या दाव्यावरही टीका केली ते म्हणाले की काँग्रेस किंवा इतर कुठलाही विरोधी पक्ष हा कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून समोर आणू शकत नाही. त्यामुळे आता ही वक्तव्यं केली जात आहेत. समोर कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार असू द्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच विराजमान होतील असंही हिमंता बिस्वा शर्मा यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांना आणखी एक सल्ला
राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर हिमंता बिस्वा शर्मा यांनी राहुल गांधींना आणखी एक सल्ला दिला आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की RSS आणि भाजपाला गुरू मानण्यापेक्षा भारतमातेला आणि भारतमातेचं चित्र असलेल्या ध्वजाला गुरू माना. नागपूरमध्ये ते आले आणि भारतमातेच्या ध्वजासमोर नतमस्तक झाले तर आम्ही त्यांचं नक्की स्वागतच करू.

राहुल गांधींना थंडी वाजत नसेल तर त्यांना तवांगला नेलं पाहिजे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांना टीशर्टबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी मी थंडीला घाबरत नाही त्यामुळे मला थंडी वाजत नाही. मी टी शर्ट घालतो आणि पुढे जातो त्याचा गवगवा करण्याची आवश्यकता वाटत नाही असं म्हटलं होतं. याबाबत हिमंता बिस्वा शर्मांना विचारलं असता ते म्हणाले की राहुल गांधी यांनी टी शर्ट विषयी बोलणं हे त्यांचं एक फॅशन स्टेटमेंट आहे. मात्र त्यांना थंडीची भीती वाटत नसल्याने थंडी वाजत नसेल तर मला वाटतं की त्यांना तवांगला नेलं पाहिजे.