सध्या देशभरात अनेक ठिकाणी भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडत आहेत. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाज्यांच्या दरवाढीसाठी मियां (मुस्लीम) व्यापारी जबाबदार आहेत, असं विधान केलं आहे. सरमा यांना आसाममधील भाज्यांच्या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. गुवाहाटीमध्ये भाज्या इतक्या महाग का आहेत? असा प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “हे मियां व्यापारी आहेत, जे चढ्या भावाने भाजीपाला विकत आहेत.”

‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, “आसाममध्ये बंगाली वंशाच्या मुस्लिमांसाठी ‘मियां’ हा शब्द वापरला जातो. आसाममध्ये बंगाली वंशाच्या मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ते प्रामुख्याने भाजीपाला आणि मासे विक्रीचा व्यवसाय करतात. अशा स्थितीत सध्या आसाममध्ये भाज्यांचे भाव प्रचंड वाढले आहेत.” त्यामुळे आसाम सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाज्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.

ओवेसी काय म्हणाले?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या या विधानानंतर एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली आहे. “भारतात असा एक गट आहे जो त्यांच्या घरातील म्हशीने दूध नाही दिलं, कोंबडीने अंडी नाही घातली तरी ते मुस्लिम समाजाला दोष देतील. कदाचित ते त्यांच्यातील वैयक्तिक दोषाचेही खापर मिया बंधूंवर टाकतील. आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातील मुस्लिम नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांच्यासोबत घट्ट मैत्री करत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दोन समुदायांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा हल्लाबोल ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे. बारपेटा येथील काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनीही सरमा यांच्यावर सांप्रदायिक/जातीय दंगली घडवण्यासाठी लोकांना सतत चिथावणी दिल्याचा आरोप केला आहे.