मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. ही घटना हैदराबादमधील सरूरनगरमधील आहे, जिथे नागराजू नावाच्या तरुणाची त्याच्या मेव्हण्याने रॉड आणि चाकूने भर रस्त्यात हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा तिथे नागराजूची पत्नी उपस्थित लोकांकडे विनवणी करत राहिली पण कोणीही तिच्या मदतीला आले नाही. अखेर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आणि आरोपीने त्याला रक्ताच्या थारोळ्यात टाकून तेथून पळ काढला.

नागराजू हा रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ली गावचा रहिवासी होता, तर त्याची पत्नी सुलताना त्याच्या शेजारच्या घनापूर गावात राहत होती. दोघे सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण सुलतानाचे कुटुंब नागराजूच्या विरोधात होते. ३१ जानेवारी रोजी नागराजू आणि सुलतानाने पळून जाऊन लाल दरवाजा परिसरातील आर्य समाज मंदिरात लग्न केले आणि लग्नानंतर सुलतानाने तिचे नाव बदलून पल्लवी ठेवले.

त्यानंतर ही घटना बुधवारी रात्री सरूरनगरमध्ये घडली. सुलतानाने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध नागराजूसोबत लग्न केले होते. याचा राग सुलतानाच्या कुटुंबीयांना आला. बुधवारी रात्री ती पतीसोबत स्कूटरवरून जात असताना सुलतानाचा भाऊ आणि काही नातेवाईकांनी तिच्यावर हल्ला केला.

या घटनेनंतर सुलतानाने जे सांगितले ते हृदय पिळवटून टाकणारे होते. आम्ही सिग्नलवर उभे असताना भावासह पाच जण तेथे आले. त्यांनी पतीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. ती ओरडत राहिली आणि तिला सोडण्यासाठी त्या लोकांचे हातपाय जोडले पण कोणीही ऐकले नाही, असे सुलताना म्हणाली.

नागराजू मुस्लिम धर्म स्विकारण्यास तयार होता

“नागराजूने माझ्या आईला सांगितले होते की तो माझ्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारेल पण माझ्या आईने ऐकले नाही. आम्ही प्रेमविवाह केला होता,” अशी नागराजूची पत्नी अश्रीन सुलतानाने सांगितले.

‘तुम्ही सांगाल तिथे मी लग्न करेल, त्याला सोडून देईल’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या डोळ्यांसमोर त्यांनी माझ्या पतीची हत्या केली. माझ्या डोळ्यासमोर त्यांना मारलं, मी काही करू शकले नाही. ‘सिग्नलवर खूप लोक होते, त्याला मारत राहिले, मी त्यांना सांगितले की मी त्याला सोडून देईल, तुम्ही ज्याच्याशी लग्न करायला सांगाल त्याच्याशी करेल. पण त्यांनी माझे ऐकले नाही. मी लग्न केले म्हणून त्यांनी नागराजूला मारले,” असेही सुलताना म्हणाली.