DY Chandrachud : माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे निवृत्त होऊन तब्बल ८ महिन्यांचा कालावधी होऊन गेला. मात्र, तरीही त्यांनी अद्याप त्यांचं सरकारी निवासस्थान सोडलं नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. डीवाय चंद्रचूड यांनी सरकारी निवासस्थान सोडण्याची मागणी पत्राच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने केंद्र सरकारकडे केली होती. डीवाय चंद्रचूड यांनी निवृत्तीनंतर अद्यापही सरकारी निवासस्थान न सोडल्यामुळे अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
त्यानंतर अखेर माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी अद्याप सरकारी निवासस्थान का सोडलं नाही? याचं स्पष्टीकरण दिलं होतं. तसेच आपल्याला देण्यात आलेल्या दुसऱ्या निवासस्थानी काही दुरुस्ती करावी लागत असल्यामुळे सरकारी निवासस्थान सोडण्यासाठी विलंब झाल्याचं चंद्रचूड यांनी म्हटलं होतं. यानंतर डीवाय चंद्रचूड यांनी सरकारी निवासस्थान सोडण्याबाबत पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे.
‘बार अँड बेंच’शी बोलताना डीवाय चंद्रचूड यांनी आपल्याला सरकारी निवासस्थान सोडायला आणखी किती दिवस लागतील? हे सांगितलं आहे. तसेच आमचं पॅकिंग पूर्ण झालं आहे, आम्ही आमचं सामान आणि फर्निचर पॅक केलं असून आम्ही या निवासस्थानातून जाण्यासाठी तयार असल्याचंही डीवाय चंद्रचूड यांनी सांगितलं आहे.
डीवाय चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?
“आता आम्ही आमच्या सामानाची पूर्ण पॅकिंग केली आहे. आमचं फर्निचर देखील पॅक केलं आहे. फक्त रोजच्या वापरातील फर्निचर वगळता बाकी सर्व पॅक केलं आहे. हे देखील आम्ही लवकरच ट्रकमध्ये टाकून नवीन घरात घेऊन जाऊ. पण यासाठी कदाचित आणखी दहा दिवस लागतील किंवा जास्तीत जास्त दोन आठवडे लागतील, असं डीवाय चंद्रचूड यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, दिल्लीतील कृष्णा मेनन मार्गावरील सरकारी निवासस्थानात नियोजित वेळेपेक्षा जास्त राहिल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादावर डीवाय चंद्रचूड यांनी पूर्णविराम दिला आहे. चंद्रचूड यांनी सांगितलं की, “दिल्लीतील कृष्णा मेनन मार्ग येथील अधिकृत बंगला रिकामा करण्यास कोणताही विलंब झालेला नाही. तसेच आता पुढील दोन आठवड्यात ते त्यांचं सरकारी निवासस्थान अधिकृतपणे सोडतील”, असं ते म्हणाले.
डीवाय चंद्रचूड यांनी असंही सांगितलं की, त्यांच्या दोन मुलींच्या दुर्मिळ वैद्यकीय स्थितीमुळे त्यांनी निवृत्तीनंतर कृष्णा मेनन मार्गावरील अधिकृत निवासस्थानात राहण्याचा कालावधी वाढवला होता. त्यांच्या दोन मुलींना दुर्मिळ अनुवांशिक आजार असल्यामुळे सरकारी निवासस्थान सोडण्यासाठी वेळ झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.