How Much Gold in The World: सण-उत्सव असोत, लग्नसमारंभ असो किंवा मग भविष्याची बेगमी करण्यासाठी करायची गुंतवणूक असो, भारतीय समाजामध्ये परंपरेनुसार पहिली पसंती ही सोन्यालाच दिली जाते. कधी दागिन्यांच्या स्वरूपात तर कधी फक्त बिस्किट वा नाण्यांच्या स्वरूपात सोन्याची कौटुंबिक देवाण-घेवाणदेखील अनेक प्रसंगी होताना दिसते. त्यासाठीची विशेष तरतूदही केली जाते. या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी प्रचंड प्रमाणावर वाढली. पर्यायाने सोन्याची किंमतही वाढत गेली. ती इतकी वाढली की आता १० ग्रॅम सोन्यासाठी तब्बल सव्वा लाखापेक्षा जास्त किंमत मोजावी लागते. पण जगात आजघडीला नेमकं किती सोनं आहे याचा कधी विचार केलाय का?

आपल्यासाठी सोनं म्हणजे एक मौल्यवान धातू आणि गुंतवणुकीचं माध्यम आहे. पण सोन्याचं मूल्य यापेक्षाही खूप जास्त आहे. त्यामुळेच कधीकाळी भारतानं आंतरराष्ट्रीय कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी चक्क सोन्याचा भलामोठा साठाच गहाण ठेवला होता. कधीकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताला देशाच्या गरजेच्या काळात त्याच सोन्यानं मदतीचा मोठा हात दिला. सोन्याच्या सुंदरतेसोबतच याच उपयुक्ततेमुळे सोन्याकडे सार्वत्रिक व सर्वकालीक ओढा पाहायला मिळतो!

जगभरात किती सोनं अस्तित्वात आहे?

World Gold Council ही जगभरातले सोन्याचे व्यवहार, साठे, किमती, वापर यासंदर्भातील विश्वासार्ह माहिती सातत्याने गोळा करणारी एक संस्था आहे. या संस्थेनं आपल्या संकेतस्थळावर सोन्यासंदर्भातल्या अनेक रंजक गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यातच आजतागायत जगभरातल्या सोन्याच्या खाणींमधून किती सोनं वर काढण्यात आलं आहे, त्याची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत जगभरात तब्बल १ लाख ८७ हजार २०० टन सोन्याचं उत्खनन झालं आहे! सोन्याचे आजचे दर पाहाता एवढ्या सोन्याची चलनातली किंमत काढायचं म्हटलं तर ती अब्जावधी रुपयांमध्ये सहज जाईल!

…तर आख्ख्या पृथ्वीला सोन्याने १ कोटी १२ लाख वेळा वेढा!

जगात सध्या अस्तित्वात असलेल्या सोन्याचं प्रमाण दुसऱ्या एका पद्धतीने सांगायचं झाल्यास सोन्याच्या तारेचा संदर्भ घेता येईल. वर्ल्ड गोर्ड कौन्सिलच्याच आकडेवारीनुसार, जर जगातलं सगळं सोनं वितळवून त्याची ५ मायक्रॉन इतक्या जाडीची तार तयार केली, तर त्या तारेनं आख्ख्या पृथ्वीला तब्बल १ कोटी १२ लाख वेळा वेढे घालता येतील इतकं सोनं आज अस्तित्वात आहे. आपल्या पृथ्वीचा एकूण व्यास १२ हजार ७५६ किलोमीटरचा आहे बरं का! तेवढ्या लांबीचे हे १ कोटी १२ लाख वेढे असतील. बरं हे सोनं फक्त आत्तापर्यंत खणून काढलेलं आहे. यापेक्षा कितीतरी पट अधिक सोनं अजूनही पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात जमिनीखाली दडल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे!

निम्म्या सोन्याचे दागिने…

दरम्यान, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, खणून काढलेल्या १ लाख ८७ हजार २०० टन सोन्यापैकी ४९ टक्के म्हणजे जवळपास ९० हजार टन सोन्याचे फक्त दागिने आहेत!