करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहकार केला. करोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. २१ जूनपासून देशात १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केल्या जात आहे. मात्र, गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना करोना लस देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत.

“गर्भधारणेमुळे संक्रमणाचा धोका वाढत नाही. पण बहुतेक गर्भवती स्त्रियांना लक्षणे नसतील किंवा सौम्य आजार असतील तर त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडू शकते. त्यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो. कोविडच्या संसर्गापासून स्वत: ला वाचवण्यासाठी त्यांनी सर्व सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यामुळे गर्भवती महिलांनी आधीच करोना लस घ्यावी,” असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनाव्दारे दिला होता.

लसीमुळे कोविडपासून गर्भवती महिलांचे संरक्षण

मंत्रालयाने मार्गदर्शक सुचनेत म्हटले आहे की, “करोना लस सुरक्षित आहे आणि कोविडपासून गर्भवती महिलांचे संरक्षण करते. कोणत्याही औषधाप्रमाणेच, लसीचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात जे सहसा सौम्य असतात. जसे की सौम्य ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणे किंवा लसीकरणानंतर १-३ दिवसांपर्यंत अस्वस्थता जाणवते. तसेच लसीकरणानंतर २० दिवसात फारच कमी गर्भवती महिलांमध्ये काही लक्षणे दिसू शकतात, ज्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज असते.” तसेच जर एखाद्या महिलेस गर्भधारणेदरम्यान कोविडची लागण झाली असेल, तर प्रसूतीनंतर लगेचच लसीकरण करावे, असे देखील मंत्रालयाने मार्गदर्शक सुचनेत सांगितले आहे.

हेही वाचा- गर्भवती महिलांना दिली जाऊ शकते करोना लस; ICMR ची माहिती

९० टक्के महिला रुग्णालयात दाखल न होता घरीच बऱ्या

जर गर्भवती महिलेला करोना विषाणूची लागण झाली तर त्यातील ९० टक्के महिला रुग्णालयात दाखल न होता घरीच बऱ्या होतात. तर तिव्र लक्षणे असलेल्या महिलांना रुग्णालयात दाखल करावे लागते. कोविडमुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असेते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा- करोना झालेल्या ५७ महिलांची प्रसूती

तसेच मुलांच्या आरोग्याबद्दल असलेल्या भीतींविषयी मंत्रालयाने मार्गदर्शक सुचनेत माहिती दिली. “करोना पॉझिटिव्ह मातांपैकी ९५ टक्के पेक्षा जास्त नवजात बाळ जन्मतःच चांगल्या स्थितीत होते. काही प्रकरणांमध्ये, करोना संसर्गामुळे वेळे आधी प्रसूती होण्याचा धोका वाढवू शकतो. तसेच मुलाचे वजन २.५ किलोपेक्षा कमी असू शकते.”