scorecardresearch

मानवाधिकार आयोगाची पश्चिम बंगाल सरकारला नोटीस

लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे तपशील देणारा अहवाल चार आठवडय़ांत मागवला आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील आठ जणांच्या हत्येच्या संबंधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पश्चिम बंगाल सरकार व राज्याचे पोलीस प्रमुख यांना गुरुवारी नोटीस जारी केली असून, लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे तपशील देणारा अहवाल चार आठवडय़ांत मागवला आहे.

‘माध्यमांतील बातम्या लक्षात घेता, या भागात कायदा व सुव्यवस्था सुरळीत नसल्याचे या द्वेषयुक्त हिंसाचारातून दिसून आले आहे,’ असे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) एका निवेदनात म्हटले आहे.

बीरभूममधील हत्याकाडांच्या संबंधात एनएचआरसीने मुख्य सचिवांमार्फत पश्चिम बंगाल सरकारला, तसेच पोलीस महासंचालकांना नोटीस जारी केली असून, चार आठवडय़ांत अहवाल मागवल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दोषींना अटक होईलच- ममता बॅनर्जी

रामपुरहाट येथील हत्यांचे संशयित शरण न आल्यास त्यांना शोधून अटक करावी लागेल, अशी कठोर भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री

ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी घेतली. दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल याची पोलीस निश्चिती करतील असेही त्यांनी सांगितले. मंगळवारी आठ जणांना जाळून मारण्यात आलेल्या बोगतुई खेडय़ाला बॅनर्जी यांनी गुरुवारी भेट दिली. या घटनेची झळ बसलेल्या १० कुटुंबांतील लोकांना कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

बळींना जाळण्यापूर्वी बेदम मारहाण

बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई खेडय़ात ३ महिला व २ मुलांसह आठ जणांना जिवंत जाळण्यात आले होते, त्यांना हत्याकांडापूर्वी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती, असे त्यांच्या उत्तरीय तपासणीत आढळले आहे. पेटवून देण्यात आलेल्या घरांमध्ये सापडलेल्या व जळून कोळसा झालेल्या मृतदेहांच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांनी चाचण्या केल्या. त्यांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, या लोकांना आधी बेदम मारहाण करण्यात आली व नंतर जिवंत जाळण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

तृणमूलच्या स्थानिक नेत्याला अटक

या हत्याकांडाच्या संबंधात तृणमूल काँग्रेसचा रामपुरहाट ब्लॉकचा अध्यक्ष अनारुल हुसेन याला अटक करण्यात आली.या भागात अशांतता पसरू शकते अशी भीती लोकांनी व्यक्त केली होती, मात्र हुसेन याने त्याकडे लक्ष न दिल्यामुळे हत्याकांड घडले. त्यामुळे त्याला पकडण्याचे निर्देश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्यानंतर काही तासांतच हुसेन याला जिल्ह्यातील तारापाठ येथून अटक करण्यात आली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांनी हुसेनच्या घरासह अनेक टिकाणी छापे घातल्यानंतर त्याला तारापीठ येथे पकडण्यात आले. त्याच्या मोबाइल फोन टॉवरचे लोकेशन पोलिसांनी शोधल्यानंतर त्याला एका हॉटेलनजिक ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी आठ जण जळून मरण पावल्याच्या घटनेच्या संबंधात तृणमूल काँग्रेसच्या या स्थानिक नेत्याची चौकशी करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, रामपुरहाट पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक त्रिदिब प्रामाणिक यांना कर्तव्यात कुचराईसाठी निलंबित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Human rights commission issues notice to west bengal government zws

ताज्या बातम्या