हैदराबादमध्ये दहावी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने फळा पुसायच्या डस्टरने बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. डेक्कन क्रोनिकलच्या माहितीनुसार, येथील जगतगिरीगुट्टा परिसरातील राजधानी शाळेत बुधवारी ही घटना घडली. यावेळी शिक्षिकेने शाळेत गैरहजर राहिल्यामुळे सुरेश कुमारच्या (१४) डोक्यात लाकडाच्या डस्टरने मारले. हा मार असह्य झाल्यामुळे सुरेश शाळेतच कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सुरेशच्या डोक्यात रक्ताची गाठ तयार झाल्याचे लक्षात आले. सध्या सुरेशवर नारायण हदयालय रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. दरम्यान, या घटनेनंतर संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यानेही याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, शाळा प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले असून संबंधित शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केली नसल्याचा दावा केला. शिक्षिकेने केवळ शाळेत गैरहजर राहिल्याबद्दल त्याला दम भरला होता. सुरेश कुमारच्या डोक्यात आधीपासूनच रक्ताची गाठ होती. केवळ यानिमित्ताने रूग्णालयात गेल्यानंतर ही गोष्ट निदर्शनास आल्याचे शाळेने म्हटले आहे. मात्र, सुरेशच्या पालकांकडून वेगळाच दावा करण्यात आला आहे. सुरेश अनेक दिवस शाळेत न गेल्यामुळे त्याच्या आईला बोलावून घेण्यात आले होते. सुरेशची आई शाळेत आल्यानंतर शिक्षिका त्यांना कार्यालयात घेऊन गेली आणि तिने आईसमोर सुरेशला मारले. मात्र, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शिक्षिकेने केवळ सुरेशच्या कानाखाली मारले. मात्र, त्यामुळेच डोक्यात रक्ताची गाठ तयार झाली का, याबाबत आम्हाला निश्चित माहिती नाही. त्यामुळे आम्ही याप्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांनी म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Oct 2016 रोजी प्रकाशित
शिक्षिकेने डोक्यात डस्टर मारल्याने विद्यार्थ्यावर शस्त्रक्रियेची वेळ
सुरेश अनेक दिवस शाळेत न गेल्यामुळे त्याच्या आईला बोलावून घेण्यात आले होते.
Written by एक्सप्रेस वृत्तसेवा
Updated:

First published on: 27-10-2016 at 15:48 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad student undergoes surgery after teacher uses duster to assault him