Elon Musk On H-1B Visa: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका नव्या निर्णयाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. एच-१बी व्हिसाच्या संदर्भात ट्रम्प प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेत भारताला धक्का दिला आहे. आता एच-१बी व्हिसासाठी तब्बल १ लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये तब्बल ८८ लाख रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत. या निर्णयाचा भारताला सर्वाधिक फटका बसणार असल्याचं तज्ञांचं मत आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.

अमेरिकेच्या या एच-१बी व्हिसाच्या संदर्भात अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत, तर अनेकांनी यावर अद्यापही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. असं असताना या एच-१बी व्हिसाच्या शुल्क वाढीच्या संदर्भात टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची एक जुनी पोस्ट आता व्हायरल होत असून त्या पोस्टवरून चर्चा रंगली आहे. मस्क यांनी त्या पोस्टमध्ये एच-१बी व्हिसाचं समर्थन केलं होतं. ‘मी एच-१ बी व्हिसामुळे अमेरिकेत आहे’, असं मस्क यांनी म्हटलं होतं. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

एलॉन मस्क यांनी काय म्हटलं होतं?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये एलॉन मस्क यांनी एच-१बी व्हिसा प्रणालीच्या बाजूने प्रतिक्रिया देत या व्हिसा प्रणालीचं समर्थन केलं होतं. एलॉन मस्क म्हणाले होते की, “स्पेसएक्स, टेस्ला आणि इतर शेकडो कंपन्या ज्यांनी अमेरिकेला मजबूत बनवलं अशा अनेक लोकांसह मी अमेरिकेत आहे, कारण एच १ बी आहे. मात्र, जर एच-१बी व्हिसा थांबवला गेला तर मी या मुद्द्यावर युद्ध करेन.”

अमेरिकेने एच-१बी व्हिसाबाबत नेमकं काय निर्णय घेतलाय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानुसार, एच-१बी व्हिसाची फी ही वार्षिक १००,००० डॉलर (सुमारे ८८ लाख रुपये) इतकी प्रचंड वाढण्यात आली आहे. याआधी या एच-१बी व्हिसासाठी कमी पैसे द्यावे लागत होते, ते आता जास्त द्यावे लागणार आहेत. तसेच एच-१बी व्हिसा धारकांपैकी ७१ टक्के हे भारतीय असल्यामुळे या निर्णयाचा भारताला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.