राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी स्वत:ला सच्चा हिंदू म्हटले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलाविरोधी असल्याचेदेखील लालू प्रसाद यादव यांनी म्हटले. भाजपचे नेते जय श्रीराम म्हणत असल्याने लालू प्रसाद यादव यांनी त्यांना महिलाविरोधी म्हटले आहे. भाजपचे नेते राम नामासोबत सीता मातेचे नाव घेत नाहीत, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. याबद्दल लालू प्रसाद यादव यांनी एक ट्विट केले आहे.
‘आम्ही सच्चे हिंदू आहोत. हिंदू धर्माच्या शिकवणीनुसार आम्ही सर्वांचा सन्मान करतो. सर्वांवर प्रेम करतो. सर्वांना सोबत घेऊन चालतो. गरिबांचे कल्याण व्हावे असे आम्हाला वाटते,’ असे लालू प्रसाद यादव यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. तर यापुढील ट्विटमध्ये ‘आम्ही सीता-राम, सीता-राम म्हणतो आणि भाजपकडून जय श्रीराम म्हटले जाते. भाजप/राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलाविरोधी असल्याने ‘सीता मातेला’ मागे टाकले जाते,’ असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
हम सच्चे हिंदू है।हिंदू धर्म की शिक्षाओं अनुसार हम सबों का सम्मान करते है,सबों को प्रेम करते है,सबक़ो साथ लेकर चलते है,ग़रीब का भला चाहते है
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) May 2, 2017
हम "सीता-राम,सीता-राम" करते है और BJP जय श्रीराम।BJP/RSS महिला विरोधी है इसलिए "माता सीता" को छोड़ देती है।सीता है तो राम है,राम है तो सीता
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) May 2, 2017
भाजपने महिला मतदारांसाठी अनेक योजना सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मागील काही महिन्यांपासून केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपने महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक जाहिराती तयार केल्या होत्या. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गरिब कुटुंबांना गॅस सिलेंडर पुरवण्याची योजना महिलांचा विचार करुनच सुरु करण्यात आली होती. यासोबतच मुस्लिम महिलांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी भाजपने तोंडी तलाकचा मुद्दा संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत दोन हात करण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आतापासून कामाला लागले आहेत. यासाठी राष्ट्रीय जनता दलाने नालंदामधील राजगीर येथे पक्ष कार्यकर्त्यांसाठी एका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. चार मेपर्यंत हे प्रशिक्षण शिबीर चालणार आहे. या शिबिराला लालू प्रसाद यादव यांनी संबोधित केले आहे.