जवळपास १५ महिन्यांपासून बंद असलेले TRP रेटिंग्ज पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बार्कला त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. तसेच, गेल्या ३ महिन्यांचे रेटिंग्ज तातडीने जाहीर करण्याचे देखील निर्देश केंद्र सरकारने BARC ला दिले आहेत. त्यामुळे लवकरच वृत्तवाहिन्यांसाठीचे टीआरपी रेटिंग्ज जाहीर केले जाणार आहेत. यासंदर्भात ऑक्टोबर २०२०मध्ये उघड झालेल्या टीआरपी घोटाळ्यामुळे या आकडेवारीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे वृत्तवाहिन्यांसाठी पुन्हा एकदा टीआरपी रेटिंग्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऑक्टोबर २०२०मध्ये उघड झालेल्या टीआरपी घोटाळ्यानंतर वृत्तवाहिन्यांसाठीचे टीआरपी रेटिंग्ज थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. BARC अर्थात Broadcast Audience Research Council ला केंद्र सरकारने तसे आदेश दिले होते. मुंबई पोलिसांनी दावा केला होता की बार्क आणि हस्ना या ग्राहक संशोधन कंपनीकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर टीआरपीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं. यानुसार टीआरपी मापन करण्यासाठी निवडण्यात आलेल्या विशिष्ट घरांमध्ये विशिष्ट वृत्तवाहिनी सुरू ठेवण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं वादात सापडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बार्कनं कार्यपद्धतीत केला मोठा बदल!

दरम्यान, आता टीआरपी रेटिंग्जसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही, असा दावा बार्ककडून करण्यात आला आहे. त्यासाठी टीआरपी कमिटीचा अहवाल आणि शिफारशींच्या आधारावर बार्कनं आपल्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल केल्याचं सांगितलं आहे. त्यात तटस्थ व्यक्तीचा बोर्ड आणि तांत्रिक समितीमध्ये समावेश करण्याच्या निर्णयाचा देखील समावेश आहे. तसेच, एक कायमस्वरूपी देखरेख समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. बार्कची माहिती मिळवण्याच्या प्रणालीमध्ये सुरक्षा अधिक कठोर करण्यात आल्याची माहिती बार्कनं केंद्राला दिली आहे.