भारत आणि न्यूझीलंडमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर उपांत्य सामना सुरू आहे. या मैदानावर भारत तब्बल ३६ वर्षानंतर पुन्हा एकदा उपांत्य सामना खेळत आहे. १९८३ मध्ये भारताने या मैदानावर यजमान इंग्लंड विरोधात उपांत्य सामना खेळला होता. इतिहासात झाकल्यास दोन्ही सामन्यामध्ये एक दुर्मिळ योगायोग समोर आला आहे.

सध्या सुरू असलेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. १९८३ मध्ये यजमान इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उपांत्य सामन्याचा हा अजब योगायोग समोर आला आहे.

१९८३ मध्ये येथे रंगलेल्या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. या सामन्यात भारताने इंग्लंड संघाला सहा गड्यांनी पराभूत केले होते. या सामन्यात इंग्लंड संघाना प्रथम फलंदाजी करताना ६० षटकांत २१३ धावा केल्या होत्या. भारताने २१४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. या सामन्यात अष्टपैलू खेळी करणाऱ्या मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. अमरनाथ यांनी गोलंदाजी करताना दोन बळी घेतले होते. तर फलंदजी करताना निर्णायक ४६ धावांची खेळी केली होती.

३६ वर्षानंतर विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. भारतीय संघ न्यूझीलंड संघाने दिलेल्या आव्हानाचा कसा पाठलाग करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सामन्यात यशस्वी धावांचा पाठलाग करून भारतीय संघ पुन्हा एकदा इतिहास रचणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.