सभागृहात कधीच काही न बोलणारेच आम्हाला बोलू दिले जात नसल्याचा आरोप करतात, असा पलटवार करीत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुधवारी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. संसदेमध्ये विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी बुधवारी सकाळी केला होता. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दुजाभाव करीत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आरोपांचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी खंडन केले आहे.
कॉंग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे सांगून जेटली म्हणाले, पक्ष नेतृत्त्वाला काही करतोय असे दाखवायचे असेल, तर नेत्यांनी नेतृत्त्व करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पक्षांतर्गत कारणांमुळे सभागृहात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असाही सल्ला जेटली यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांना दिला.
दरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही राहुल गांधी यांचे आरोप फेटाळले आहे. सभागृहाचे कामकाज नियमांप्रमाणे चालते. त्याचप्रमाणे बोलण्यासाठी कोणाला किती वेळ दिला, याची सुद्धा माहिती सगळ्यांना मिळू शकते, असे सांगत पत्रकारांनी राहुल गांधी यांच्या आरोपांची सत्यता तपासावी, असेही त्या म्हणाल्या.