अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापन करण्यात आली आहे. एकीकडे दिल्लीत या ट्रस्टची आज पहिली बैठक पार पडली. तर, दुसरीकडे लखनऊ येथे राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला मशिदीच्या निर्मितीसाठी तुम्ही ट्रस्टची स्थापना का करू शकत नाही? असा प्रश्न केला आहे. याचबरोबर देश सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

“तुम्ही जसं राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करू शकता, मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्ट का  निर्माण करू शकत नाही ? देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे.” असं शरद पवार म्हणाले आहेत. ‘एएनआय’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

लखनऊ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्यस्तरीय संमेलनाप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी  त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच काम सरकारकडून केलं जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी पवारांना उत्तर प्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पाबाबतही टिप्पणी केली. या सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीच नसल्याचे ते म्हणाले. तसेच, बेरोजगारांना मासिक प्रशिक्षण भत्ता देणार असल्याचे सांगितले आहे, मात्र हा भत्ता मिळेल की नाही याबाबत देखील काही सांगणं अवघड आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी व तरुणांची परिस्थिती दयनीय असल्याचेही यावेळी पवार म्हणाले.

भाजपावर टीका करताना पवार म्हणाले, लोकांमध्ये फुट पाडून राज्य करा हे भाजपाचे धोरण आता जनतेने चांगल्याप्रकारे ओळखलं आहे. जनता आता तुमच्या थापांना बळी पडणार नाही. सीएए आणि एनआरसीमध्ये काही त्रुटी आहेत, यामध्ये मुस्लीम अल्पसंख्यांकांकडे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचंही पवारांना यावेळी सांगितलं.