एक्स्प्रेस वृत्त, नवी दिल्ली
सेवाशुल्क घेण्यासाठी हॉटेल्स ग्राहकांवर सक्ती करू शकत नाहीत, असे स्पष्ट करीत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) व्यापारातील गैरप्रकार आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी सोमवारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

हॉटेलांच्या मनमानी सेवा शुल्क आकारणीविरोधात ग्राहकांकडून राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (एनसीएच) वर अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्याने या संदर्भात केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात ‘सीसीपीए’च्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती देण्यात आली आहे. ‘सीसीपीए’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्सना ग्राहकांच्या बिलात कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही नावाखाली सेवा शुल्क आकारता येणार नाही, असे या निवेदनात स्पष्ट केले आहे.

हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्सना सेवाशुल्कासाठी ग्राहकांवर सक्ती करता येणार नाही. किंबहुना त्यांनी ग्राहकांना सेवा शुल्क हे ऐच्छिक असल्याचे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. तसेच सेवा शुल्कासह दिलेल्या बिलाच्या एकूण रकमेवर वस्तू आणि सेवाकरही वसूल करता येणार नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे.

ग्राहकांनी काय करावे?
सेवाशुल्कासह बिल दिले असेल किंवा सेवाशुल्कासह दिलेल्या बिलावर वस्तू आणि सेवा कर लावण्यात आला असेल तर संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापकाला त्यातून सेवाशुल्क काढून टाकण्याची विनंती करावी. असा गैरप्रकार आढळल्यास आणि सक्ती केली गेल्यास तक्रार करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रार कोठे करावी?
’हॉटेलने सेवाशुल्कासह बिल भरण्याची सक्ती केल्यास १९१५ या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (एनसीएच)वर किंवा एनसीएच या मोबाइल अॅ्पवर तक्रार करावी.
’ई-दाखिल ( http:// www. e- daakhil. nic. in) या पोर्टलवरही तक्रार करता येऊ शकेल.
’हा व्यापार गैरप्रकार असल्याने ‘ग्राहक आयोगा’कडेही तक्रार दाखल करावी.