नोएडातील ट्विन टॉवर्स आधीच्या सरकारमधील भ्रष्टाचाराचे प्रतिक आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ३२ मजली ‘एपेक्स’ आणि २९ मजली ‘सेयान’ हे दोन टॉवर्स आज दुपारी अडीचच्या सुमारास पाडण्यात येणार आहेत. नोएडातील सेक्टर ९३ A मधील ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ प्रकल्पातील या टॉवर्समध्ये ८५० फ्लॅट्स आहेत. या टॉवर्सची उंची १०० मीटर लांब म्हणजेच कुतुबमिनारापेक्षाची जास्त आहे.

विश्लेषण: नोएडातील महाकाय ट्विन टॉवर्स आज होणार जमीनदोस्त; ५६० पोलिसांचा ताफा, एनडीआरएफ तैनात, नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…

‘एडिफाय इंजिनीअरिंग’ला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. हे टॉवर्स पाडण्यासाठी ४६ जणांची टीम कार्यरत असणार आहे.  ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे हे टॉवर्स पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं ३१ ऑगस्ट २०२१ रोजी दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तीनदा टॉवर्स पाडण्याची तारिख विविध कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर आज हे टॉवर्स जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.

अनधिकृत बांधकामाचा आरोप करत ‘द इमेरॉल्ड कोर्ट ओनर्स रेसिडेन्ट्स वेलफेअर’ने(RWA) या टॉवर्सविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने बांधकाम अनधिकृत ठरवून हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते. या विरोधात इमारत मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानेही अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत पाडकामाचे आदेश दिले होते.

दरम्यान, या पाडकामासाठी नोएडा परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एनडीआरएफचं(NDRF)पथक देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पाडकाम करण्याच्या अर्धा तासआधी नोएडा एक्स्प्रेसवे बंद करण्यात येणार आहे. यासाठी नोएडातील अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.