वृत्तसंस्था, नवी दिल्ली, वॉशिंग्टन
Donald Trump H-1B Policy Update : ‘एच-१बी’ व्हिसासाठी दरवर्षी एक लाख डॉलर भरण्याच्या नियमाचा फटका अमेरिकी कंपन्यांनाही बसेल आणि त्याचा भारताला लाभ होईल असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे अमेरिकेत जाऊन उत्तम कारकीर्द घडवण्याची स्वप्ने पाहणारे आता बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये काम करतील. त्यामुळे यापुढे या शहरांमधून पेटंटसाठी अर्जांची संख्या वाढेल, असे अपेक्षा निति आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी शनिवारी व्यक्त केली.
तर, ‘एच-१बी’ व्हिसामुळे जगभरातून प्रज्ञावंत अमेरिकेकडे आकर्षित झाले. त्यांच्यासमोर आता अभूतपूर्व अडथळा उभा राहिल्याचे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचे तत्कालीन सल्लागार अजय भुतोरिया यांनी सांगितले. शुल्कवाढीमुळे लहान व्यवसाय आणि विविध प्रतिभावान कर्मचाऱ्यांवर विसंबून असलेल्या स्टार्टअप कंपन्या उद्ध्वस्त होतील असा इशारा त्यांनी दिला. अमेरिकी काँग्रेस सदस्यांनीही या निर्णयावर टीका केली आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या घोषणेनंतर ‘इमिग्रेशन अटर्नी’ आणि कंपन्यांनी अमेरिकेबाहेर कामासाठी किंवा सुट्टीसाठी गेलेले ‘एच-१बी’ व्हिसाधारक किंवा त्यांच्या कुटुंबीयांना २४ तासांच्या आत अमेरिकेत परतण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा त्यांना अमेरिकेबाहेर अडकून पडावे लागेल आणि जाहीरनामा लागू झाल्यानंतर त्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाईल अशी भीती ‘इमिग्रेशन अटर्नी’ आणि कंपन्यांनी व्यक्त केली आहे.
‘नासकॉम’कडून चिंता व्यक्त
शुल्कवाढ लागू करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने केवळ एक दिवसाची मुदत दिल्यामुळे ‘नासकॉम’ या औद्योगिक संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयाचा फटकका तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना बसेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. विशेषतः यामुळे सध्या परदेशात सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये अडथळे येऊन व्यवसायात अनियमितपणा येऊ शकतो अशी शक्यता नासकॉमकडून व्यक्त करण्यात आली. असे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रसंगी तडजोडी कराव्या लागू शकतात. त्याचवेळी अमेरिकेत कल्पकतेला मिळणारा प्रोत्साहन आणि तेथील व्यापक रोजगार अर्थव्यवस्था यावर विपरित परिणाम होतील असा इशारा नासकॉमने दिला.
‘ही तर मोदींच्या वाढदिवसाची भेट’
अमेरिकेच्या ‘एच-१बी’ व्हिसा धोरणावरून काँग्रेसने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. ‘‘मोदी आतापर्यंतचे सर्वांत कमकुवत पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदीजी, वाढदिवसाच्या शुभेच्छांनंतर तुम्हाला मिळालेल्या परतीच्या भेटवस्तूंमुळे भारतीयांना वेदना होत आहेत. तुमच्या ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’ची ही वाढदिवसाची परतीची भेट आहे,’’ असा टोला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला. परराष्ट्र धोरण हे गळाभेट आणि एखादा ‘इव्हेंट’ नसून, राष्ट्र प्रथम आणि भारताच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याबद्दल आहे, असेही खरगे यांनी सुनावले.
या निर्णयामुळे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रज्ञावंतांच्या तोंडावर दरवाजे बंद करून अमेरिकेने त्यांना बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि गुरुग्रामला जाण्यास बाध्य केले आहे. अमेरिकेत काम करणारे उत्कृष्ट डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ यांना आता विकसित भारतासाठी योगदान देण्याची संधी आहे.- अमिताभ कांत, माजी सीईओ, निति आयोग
‘एच-१बी’ व्हिसा शुल्क वाढवण्याचा निर्णय हा अमेरिकेला अतिशय कुशल कर्मचाऱ्यांपासून दूर लोटण्याचा एक अविचारी प्रयत्न आहे. या कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळापासून अमेरिकेचे उद्योग मजबूत केले आहेत, नवोपक्रमाला चालना दिली आहे आणि लाखो अमेरिकी लोकांना रोजगार देणारे उद्योग उभारण्यास मदत केली आहे.- राजा कृष्णमूर्ती, काँग्रेस सदस्य