भारतीय लष्कराने रविवारी केलेल्या तोफांच्या स्ट्राइकमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. पीओकेमधील नीलम व्हॅली आणि अन्य तीन ठिकाणी दहशतवाद्यांच्या लाँच पॅडसवर तोफगोळे डागण्यात आले. या हल्ल्यामध्ये त्यांचे किती नुकसान झाले त्याचे सुरक्षा पथकांनी विश्लेषण केले. पाकिस्तानच्या १६ सैनिकांसह १८ दहशतवादी या कारवाईत मारले गेल्याची माहिती अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
१९ आणि २० ऑक्टोंबरच्या दरम्यान भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचाय लाँच पॅडसवर तोफ गोळयांचा मारा केला होता. नेमके किती दहशतवादी मारले गेले ते लष्कराने स्पष्ट केलेले नाही. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने ही कारवाई केली. जैश-ए-मोहम्मद आणि अन्य संघटनांचे दहशतवादी या लाँच पॅडसमध्ये होते. भारतीय लष्कराने अत्यंत अचूकतेने या लाँच पॅडसवर तोफ गोळयांचा मारा केला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी लष्करप्रमुख बीपिन रावत यांनी दोन वेळा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना फोन करुन कारवाईची माहिती दिली.
POK मध्ये ५० दहशतवादी, सात एसएसजी कमांडो ठार
भारताने सोमवारी पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. भारताने सात दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या कारवाईत ५० दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रिपब्लिक वाहिनीने लष्करातील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. पाकिस्तानच्या बॅट कमांडो फोर्सच्या सात एसएसजी कमांडोंनी तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या हद्दीत या कमांडोंचे मृतदेह पडलेले आहेत. पाकिस्तानने अजूनही या मृतदेहांवर दावा केलेला नाही. नियंत्रण रेषेवर भारताच्या बोफोर्स तोफांचे अक्षरक्ष: तांडव सुरु आहे. बोफोर्स तोफांमधून जवळपास ३ हजार तोफगोळे डागण्यात आल्याचा सूत्रांचा दावा आहे. सात पैकी पीओकेमध्ये ३० किलोमीटर आत असणाऱ्या दोन तळांवर अचूकतेने प्रहार करण्यात आला. भारताच्या तोफ गोळयांच्या वर्षावामध्ये पीओकेमधील नीलम-झेलम हायड्रोपावर प्रकल्पाच्या तीन नंबर गेटचेही नुकसान झाले आहे.